“सचिन पायलट यांची उमेदवारी जवळपास निश्चित, पण CM पद मला सोडवणार नाही”: अशोक गेहलोत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 04:04 PM2023-10-19T16:04:06+5:302023-10-19T16:06:09+5:30
Rajasthan Assembly Election 2023: मला मुख्यमंत्रीपद सोडायचे आहे, पण खुर्ची मला सोडत नाही, असे अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.
Rajasthan Assembly Election 2023: राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होऊ शकते. काँग्रेसने जवळपास ३० उमेदवारांची नावे जवळपास निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे. या लोकांना पक्षाच्या हायकमांडने निवडणुकीची तयारी करण्यासही सांगितले आहे. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या विधानामुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले होते की, मला मुख्यमंत्रीपद सोडायचे आहे, पण खुर्ची मला सोडत नाही आणि मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही मला सोडत नाही. या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात होते.
सचिन पायलट यांची उमेदवारी जवळपास निश्चित
सचिन पायलट यांच्यासह त्यांनी सांगितलेली सर्व तिकिटे जवळपास निश्चित झाली आहेत. त्यांनी सूचवलेल्या उमेदवारांच्या नावावर कोणताही आक्षेप घेतलेला नाही. यापेक्षा दुसरे मोठे काय असू शकते, असा सवाल गेहलोत यांनी केला. पक्षाध्यक्ष झाल्यानंतर सोनिया गांधींनी सर्वप्रथम मला मुख्यमंत्री केले. हायकमांडचा माझ्यावर विश्वास असण्यामागे काहीतरी कारण असावे. देशात जे वातावरण आहे, त्याचा राहुल गांधी सामना करत आहेत. राहुल गांधी यांच्या लढ्याला आपण बळकटी द्यायला हवी, असे अशोक गेहलोत यांनी सांगितले.
दरम्यान, आमच्यात इतके प्रेम आणि आपुलकी आहे की काय सांगू? आता आमच्यात (गेहलोत आणि पायलट) मतभेद, वाद का होत नाहीत, याची विरोधकांना (भाजप) चिंता आहे? तुम्ही सचिन पायलट यांचा उल्लेख करत असाल, पण तसे नाही, सगळे निर्णय अतिशय चांगल्या पद्धतीने घेतले जात आहेत. आम्ही सर्वजण ४० दिवस हॉटेलमध्ये राहिलो. बाहेर आल्यानंतर मी म्हणालो की, आम्ही सर्व विसरून आता काम करू, असे गेहलोत यांनी सांगितले.