सचिन पायलटांच्या संपत्तीत दुप्पट वाढ; पत्नीला घटस्फोट, प्रतिज्ञापत्रातून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 05:53 PM2023-10-31T17:53:44+5:302023-10-31T17:54:28+5:30
२०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सचिन पायलट यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात सारा पायलट यांचाही उल्लेख केला होता.
जयपूर – काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी टोंक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना पायलट यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून सर्वांना हैराण करणारी गोष्ट उघड झाली. सचिन पायलट यांनी स्वत:ला घटस्फोटित म्हटलं आहे. टोंक विधानसभा मतदारसंघातून पायलट यांनी उमेदवारी अर्ज भरताना हे प्रतिज्ञापत्र जोडले आहे. त्यात त्यांनी पत्नीच्या नावासमोर घटस्फोट असं लिहिलं आहे.
२०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सचिन पायलट यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात सारा पायलट यांचाही उल्लेख केला होता. त्याचसोबत त्यांच्या संपत्तीचे विवरणही जोडले होते. परंतु २०२३ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी घटस्फोट झाल्याचे सांगितले आहे. सचिन पायलट यांचे लग्न जम्मू काश्मीरातील दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुला यांची मुलगी सारा पायलटसोबत झाले होते. सारा ही माजी मुख्यमंत्री उमर अब्दुला यांची बहीण आहे. सचिन आणि साराला दोन मुले आहेत. ज्यांचे नाव आरन आणि विहान आहे. पायलट यांनी प्रतिज्ञापत्रात दोन्ही मुले त्यांच्यावर निर्भर असल्याचे म्हटलं आहे.
विशेष म्हणजे जानेवारी २००४ मध्ये सचिन आणि सारा यांचे लग्न झाले होते. या लग्नात खूप कमी जणांना निमंत्रण देण्यात आले होते. सचिन पायलट आणि सारा हे वेगळे झाल्याची चर्चा याआधीही अनेकदा झाली आहे. ९ वर्षापूर्वी सचिन सारा विभक्त झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळीही सचिन पायलट आणि सारा हे वेगळे झाल्याची चर्चा होती. परंतु त्यावेळी या दोघांनी ही अफवा असल्याचे सांगत चर्चेचे खंडन केले होते.
संपत्तीत झाली दुप्पट वाढ
त्याशिवाय सचिन पायलट यांनी निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. यानुसार गेल्या ५ वर्षात पायलट यांची संपत्ती दुप्पट झाल्याचे दिसते. २०१८ मध्ये सचिन पायलट यांनी त्यांची संपत्ती ३.८ कोटी असल्याचे सांगितले तर यंदा म्हणजे २०२३ च्या निवडणुकीत जवळपास ही संपत्ती ७.५ कोटीपर्यंत वाढल्याचे प्रतिज्ञापत्रात जाहीर केले आहे.