राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग, अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 03:10 PM2023-08-13T15:10:25+5:302023-08-13T15:11:01+5:30
पक्ष प्रवेशाची तिसरी फेरी शनिवारी पार पडली. यामध्ये एकाच वेळी अनेक नेत्यांना पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले.
जयपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक वर्षअखेर होणार आहे. या निवडणुकीसाठी आतापासूनच सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप जोरदार रणनीतीने पुढे जात आहे. निवडणुकीच्या चार ते पाच महिन्यांपूर्वीच भाजपाने आपली दारे नेत्यांच्या पक्ष प्रवेशासाठी खुली केली आहेत. यापूर्वी पक्षाविरुद्ध बंडखोरी केलेल्या किंवा अनुशासनहीनतेच्या आरोपाखाली हाकलून दिलेल्यांसह अपक्ष नेते आणि माजी अधिकाऱ्यांच्या पक्षात प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पक्ष प्रवेशाची तिसरी फेरी शनिवारी पार पडली. यामध्ये एकाच वेळी अनेक नेत्यांना पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले.
भाजपचे प्रदेश प्रभारी अरुण सिंह, प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी, विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि राष्ट्रीय सचिव अलका गुर्जर यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी पक्षाचे सदस्यत्व घेतले. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेल्यांमध्ये निवृत्त न्यायाधीश किशनलाल गुर्जर, गुर्जर आरक्षण आंदोलनाशी संबंधित असलेले वकील अतरसिंग गुर्जर, निवृत्त आयपीएस पवन जैन, खासदार सुभाष सिंह, 2008 मध्ये पक्षाविरोधात बंडखोरी करणाऱ्या अनिता कटारा आणि 2018 मध्ये बारमेरमधून भाजपच्या उमेदवार राहिलेल्या मृदुरेखा चौधरी यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला.
'या' नेत्यांनीही भाजपमध्ये केला प्रवेश
खंडेलाचे माजी उपप्रमुख सुशीला खैरवा, मोतीलाल खरैरा, भरत सिंह, माजी आमदार गोपीचंद गुर्जर, युगवीर पटेल, माजी कर्मचारी नेते महेश व्यास, दिनेश यादव, किशनलाल मेघवाल, महेंद्र शर्मा, सिरोहीच्या बान आश्रमाचे महंत राजगिरी महाराज, विजय सिंह, मिश्रीनाथ, राजन राजावत, रामसहाय रावत, देवकरण, राजाराम आणि भगवान सिंह गुर्जर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
मोदींचा देशात व जगात आदर वाढला - सी.पी. जोशी
भाजप प्रदेशाध्यक्ष सी.पी.जोशी म्हणाले की, काँग्रेसने फक्त देश तोडण्याचे काम केले आहे. मात्र देशाला जोडण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले आहे. त्यामुळे लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. काँग्रेस 60 वर्षे काहीही करू शकली नाही. गरीबांना फक्त गरीबच ठेवण्यात आले. पण 10 वर्षात पंतप्रधान मोदींचा देशात आणि जगात आदर वाढला आहे. तलेच, राजस्थानमधील काँग्रेस सरकारने तरुण, शेतकरी आणि महिलांची फसवणूक केली आहे, असा आरोप सी.पी. जोशी यांनी केला.