राजस्थान विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, आता 'या' दिवशी होणार मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 04:57 PM2023-10-11T16:57:50+5:302023-10-11T16:58:19+5:30
निवडणूक आयोगाने राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे.
जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. निवडणूक आयोगाने राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे. आता राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर ऐवजी २५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने राजस्थानसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. राजस्थानमध्ये एका टप्प्यातील मतदानाची तारीख २३ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती. परंतु, तारीख जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि विविध माध्यमांनी निवडणुकीच्या तारखेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपली मते मांडली होती.
२३ नोव्हेंबरला राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर लग्नसमारंभ असणार आहेत. अशा परिस्थितीत लोकांची गैरसोय होणार आहे. वाहनांची कमतरता भासणार असून अशा स्थितीत मतदानावरही परिणाम होऊ शकतो, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने विचार करून आता मतदानाची तारीख बदलून २३ नोव्हेंबर ऐवजी २५ नोव्हेंबर केली आहे.
दोन दिवसांपूर्वी राजस्थानसह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली होती. या ५ राज्यांच्या नोव्हेंबर २०२३ मध्ये निवडणुका होणार आहेत. मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होईल. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबरला, दुसऱ्या टप्प्यातील १७ नोव्हेंबरला मतदान होईल. तर तेलंगाणात ३० नोव्हेंबरला मतदान होईल. मध्य प्रदेशमध्ये मतदान १७ नोव्हेंबरला होणार आहे. सर्व राज्यांचे निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबरला लागतील.
दरम्यान, राजस्थान आणि छत्तीसगड या दोन मोठ्या राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेससाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा असेल. भाजपसाठी या निवडणुकीत बरेच काही पणाला लागले आहे, कारण लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम निश्चित होणार आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये थेट लढत होणार असून, तेलंगणामध्ये बीआरएस, काँग्रेस आणि भाजपमध्ये तर मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट विरुद्ध काँग्रेस अशी टक्कर असणार आहे.