भजनलाल यांनी घेतली राजस्थानच्या CM पदाची शपथ; तर दिया कुमारी, प्रेमचंद बैरवा उपमुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 02:12 PM2023-12-15T14:12:20+5:302023-12-15T14:13:00+5:30
भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी आपल्या आई आणि वडिलांचा आशीर्वाद घेतला. यापूर्वी त्यांनी मंदिरात जाऊन पूजा केली.
भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. जयपूर येथील अलबर्ट हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यपाल कलराज मिश्र यांनी भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. महत्वाचे म्हणजे आजच भजनलाल यांचा वाढदिवसही आहे. भजनलाल यांच्या समवेत दोन उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनीही शपथ घेतली.
यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, पीयूष गोयल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, वसुंधरा राजे, अर्जुनराम मेघवाल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आदी उपस्थित होते.
आई-वडिलांचे पाय धुवून घेतला आशीर्वाद -
भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी आपल्या आई आणि वडिलांचा आशीर्वाद घेतला. यापूर्वी त्यांनी मंदिरात जाऊन पूजा केली.
#WATCH राजस्थान के मनोनीत मुख्यमंत्री भजनलाल शर्मा ने आज शपथ ग्रहण समारोह से पहले अपने पिता का आशीर्वाद लिया। pic.twitter.com/m9zksD5TfP
— ANI_HindiNews (@AHindinews) December 15, 2023
राजस्थानात 200 पैकी 199 जागांवर मतदान झाले होते. एका जागेवर उमेदवाराच्या निधमामुळे निवडणूक होऊ शकली नव्हती. यांपैकी, भाजपने 115 जागांवर विजय मिळवला आहे. तर, काँग्रेसला 69 जागा मिळाल्या आहेत.
भजनलाल हे पहली भरतपूर येथील आहेत आणि पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. त्यांच्या नावाची मंगळवारी पक्षाचे केंद्रीय पर्यवेक्षक राजनाथ सिंह, सरोज पांडे आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली.