माणुसकीला काळीमा फासणारी घटना; अल्पवयीन मुलीला बलात्कारानंतर भट्टीत जिवंत जाळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 13:34 IST2023-08-03T13:33:52+5:302023-08-03T13:34:36+5:30
12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, कुटुंबीयांना बांगडी आणि शरीराचे तुकडे सापडले.

माणुसकीला काळीमा फासणारी घटना; अल्पवयीन मुलीला बलात्कारानंतर भट्टीत जिवंत जाळले
Rajasthan Crime: राजस्थानच्या भिलवाडातून एका 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर भट्टीत जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या कुटुंबीयांना भट्टीजवळ तिची चांदीची बांगडी दिसल्याने त्यांच्या मनात नको तो संशय आला. याबाबत त्यांनी परिसरातील लोकांकडे चौकशी केली असता मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिला भट्टीत जाळल्याची माहिती मिळाली.
सविस्तर माहिती अशी की, हे संपूर्ण प्रकरण भिलवाडातील कोत्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरसिंहपुरा गावाचे आहे. गावात राहणारी 12 वर्षीय मुलगी शेळ्यांना चारण्यासाठी शेतात गेली होती. बराच वेळ झाला पण मुलगी घरी न परतल्यामुळे घरच्यांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना शेतात वीटभट्टीत जळत असलेली दिसली. भट्टीजवळ पाहिले असता कोळशाच्या राखेत मुलीची चांदीची बांगडी आढळली. भट्टीजवळ मुलीच्या मृतदेहाचे तुकडेही सापडले.
भट्टीजवळ शरीराचे अवयव सापडले
परिसरात चौकशी केल्यानंतर मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समजले. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच एक पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक तपास पथकालाही पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक टीमने मुलीचे अवयव आणि ब्रेसलेट जप्त केले आहेत. सध्या पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.