डझनभर रॅली, सहा रोड शो... राजस्थानमध्ये शेवटच्या टप्प्यात नरेंद्र मोदी-अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 12:27 PM2023-11-20T12:27:01+5:302023-11-20T12:52:15+5:30
नरेंद्र मोदी आणि अमित शाह सोमवारपासून राजस्थानमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात करतील, दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या भागात जवळपास १२ रॅली आणि ६ रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे.
जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने मोठा प्लॅन तयार केला आहे. राजस्थानमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली आहे. आता निवडणूक प्रचार संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सोमवारपासून राजस्थानमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात करतील, दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या भागात जवळपास १२ रॅली आणि ६ रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभा २३ नोव्हेंबरला संपणाऱ्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात होणार आहेत. नरेंद्र मोदी सोमवारी पाली आणि हनुमानगडमध्ये सभा घेतील, त्यानंतर राज्याचे प्रमुख शहर असलेल्या बिकानेरमध्ये मेगा रोड शो होईल. दरम्यान, नरेंद्र मोदींनी रविवारी राजस्थानमध्ये दोन सभा घेतल्या, ज्यात राजस्थानचे विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांच्यासाठी चुरूमध्ये एक सभा होती. नरेंद्र मोदी मंगळवारी पुन्हा राजस्थानमध्ये असतील आणि बारा, कोटा आणि करौली येथे तीन सभा घेणार आहेत.
नरेंद्र मोदी राज्याची राजधानी जयपूरमध्ये रोड शोने दिवसाचा समारोप करतील, जो गेल्या आठवड्यात इंदूरमधील त्यांच्या रोड शोसारखा भव्य कार्यक्रम होण्याची अपेक्षा आहे. प्रचार संपण्यापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मतदारसंघ असलेल्या जोधपूरमध्ये नरेंद्र मोदींच्या आणखी रॅली आणि रोड शोचेही नियोजन केले जात आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शाह सोमवारपासून तीन दिवस राजस्थानमध्ये व्यापक प्रचार करणार आहेत.
अमित शाह तीन दिवसांत अलवर, झुंझुनू, सीकर, पाली आणि जालोरमध्ये सहा रॅली घेणार आहेत. याचबरोबर, अमित शाह सवाई हे माधोपूर, सिरोही आणि जयपूरमध्ये रोड शो करणार आहेत. राज्याच्या राजधानीत नरेंद्र मोदींच्या रोड शोनंतर २३ नोव्हेंबरला जयपूरमध्ये अमित शाह यांच्या रोड शोचे नियोजन करण्यात आले आहे. सत्ताधारी काँग्रेस सरकारवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने अंतिम टप्प्यात प्रचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे ठरवले आहे.