भाजपची रणनिती; मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानमध्येही खासदारांना दिले विधानसभेचे तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 06:01 PM2023-10-09T18:01:10+5:302023-10-09T18:02:44+5:30
भाजपने माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्यासह सात खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे.
Rajasthan Election 2023: पुढील महिन्यात राजस्थान विधानसभेची निवडणूक होणार आहे. यासाटी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. 41 उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजपने 7 खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे. असाच प्रयोग भाजपने मध्य प्रदेशातही केला आहे. राज्यवर्धन राठौर, दिया कुमारी, नरेंद्र कुमार, भगीरथ चौधरी, किरोरी लाल मीना, बाबा बालकनाथ आणि देवी सिंह पटेल, या खासदारांना भाजपने तिकीट दिले आहे.
राजस्थानमधून निवडून येणारे खासदार राज्यवर्धन राठोड यांना पक्षाने झोटवाडा येथून उमेदवारी दिली आहे. तिजारा येथून खासदार असलेले बाबा बालकनाथ, यांनाही पक्षाने राज्याच्या निवडणुकीत उतरवले आहेत. याशिवाय सवाई माधोपूरमधून किरोरी लाल मीना, किशनगडचे खासदार भगीरथ चौधरी आणि सांचोरचे खासदार श्री देवजी पटेल यांनाही विधानसभा निवडणुकीत तिकीट दिले आहे.
दरम्यान, वसुंधरा राजे सिंधिया यांच्या जवळचे असलेले आमदार नरपत सिंह राजवी आणि राजपाल सिंह शेखावत यांचे तिकीट कापण्यात आले आहे. पहिल्या यादीत वसुंधरा कॅम्पमधील आमदारांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विद्याधर नगर (जयपूर) येथून आमदार नरपत सिंह राजवी यांच्या जागी खासदार दिया कुमारी यांना आणि झोटवाडा (जयपूर) येथून माजी मंत्री राजपाल सिंह शेखावत यांच्या जागी राज्यवर्धन सिंह राठोड यांना तिकीट देण्यात आले आहे.