अबब! उदयपूरच्या 'या' हॉटेलचे भाडे ऐकून थक्क व्हाल, एवढ्या पैशात चारचाकी खरेदी कराल...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 09:53 PM2023-12-27T21:53:41+5:302023-12-27T21:54:44+5:30
उदयपूरच्या या जगप्रसिद्ध लेक व्ह्यू हॉटेलमध्ये देश-विदेशातून पर्यटक राहायला येतात.
उदयपूर: नवीन वर्षानिमित्त लोक विविध ठिकाणी फिरायला जात आहेत. अशातच, जगभरात स्वतःची खास ओळख असलेल्या राजस्थानच्या उदयपूरमधील एका जगप्रसिद्ध हॉटेल्सचे भाडे नवीन वर्षाच्या निमित्ताने गगनाला भिडले आहे. उदयपूरच्या या सर्वात आलिशान हॉटेल एका दिवसाच्या भाड्यात तुम्ही टाटा नेक्सॉन/ह्युंदाई क्रेटासारखी गाडी घेऊ शकता.
नवीन वर्षानिमित्ताने पर्यटक देशभरातील विविध पिकनिक स्पॉटवर फिरायला जात आहेत. यामुळे जवळपास सर्वच हॉटेल्सने आपले भाडे वाढवले आहे. अशातच, उदयपूरच्या हॉटेलचे दर 11 लाखांच्या आसपास पोहोचले आहे. आम्ही ज्या हॉटेलबद्दल बोलत आहोत, ते उदयपूर शहरातील ताज लेक पॅलेस हॉटेल आहे. हे हॉटेल उदयपूर शहरातील प्रसिद्ध पिचोला तलावाच्या मध्यभागी बांधले आहे. जगभरातील पर्यटक या हॉटेलमध्ये राहण्यासाठी येतात.
हा संगमरवरी लेक पॅलेस उदयपूरच्या महाराणी यांनी उदयपूर शहरातील लेक पिचोला येथे बांधला होता. सध्या हे ओबेरॉय ग्रुपकडे आहे. या हॉटेलमध्ये राहून तुम्हाला राजा-राणीसारखे वाटेल. येथे पुरवल्या जाणार्या सुविधाही आलिशान आहेत. या हॉटेलमधून उदयपूरच्या पिचोला तलावाचे सुंदर नजारे पाहता येतात. यासोबतच सिटी पॅलेस आणि शहरातील विविध घाटांचे दृश्यही येथून पाहता येते.
दिवसाचे भाडे 11 लाख रुपये
मिळालेल्या माहितीनुसार, या हॉटेलमधील रुम्सचे बुकिंग साधारणपणे 60 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत असते. मात्र सध्या पर्यटन हंगाम असल्याने हॉटेल्सच्या भाड्यात सातत्याने वाढ होत आहे. उदयपूर शहरातील हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, पर्यटन हंगामामुळे दरवर्षी हॉटेलचे भाडे वाढत आहे. त्यामुळे शहरातील सर्वच हॉटेल्सच्या भाड्यात दिवसेंदिवस सातत्याने वाढ होत आहे. सध्या ताज लेक पॅलेसचे भाडे 11 लाख रुपयांच्या आसपास पोहोचले आहे. असे असूनही अनेक पर्यटक येथे राहणे पसंत करत आहेत.