ऑफिसमध्ये वेळत 'चहा' आला नाही, अधिकाऱ्याने चहावाल्यास पाठवली 'नोटीस'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 11:15 AM2023-08-03T11:15:52+5:302023-08-03T11:19:28+5:30
ब्लॉक को-ऑर्डिनेटर मोहनलाल यांनी पंयायत समिती आवारात चहाचे दुकान लावणाऱ्या बिरमचंदला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे
राजस्थानच्या झालवाड जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनच्या ब्लॉक को-ऑर्डिनेटरने एका चहावाल्यास नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे केवळ नियमित वेळत चहावाल्याने कार्यालयात चहा पोहोचवला नाही, म्हणून त्याला ही नोटीस बजावण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आता, या नोटीसाला चहावाल्याने दिलेल्या उत्तराचीही चर्चा रंगली आहे. तसेच, नोटीसमध्ये अधिकाऱ्याने लिहिलेल्या मजकुरावरुनही सोशल मीडियावर हा प्रकार लक्षवेधी ठरला आहे.
चहावाल्याने म्हशीचं दूध कायम तयार ठेवलं पाहिजे, आणि कुठल्याही अधिकाऱ्याचा फोन आल्यानंतर चहा तयार करुन पाठवला पाहिजे, असा आशय या चहावाल्यास पाठवलेल्या नोटीसमध्ये आहे. त्यामुळे ही नोटीस सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. नेटीझन्स या नोटीसवरुन गेहलोत सरकारला लक्ष्य करत आहेत. त्यावरुन, मिम्सही बनवले जात आहेत.
ब्लॉक को-ऑर्डिनेटर मोहनलाल यांनी पंयायत समिती आवारात चहाचे दुकान लावणाऱ्या बिरमचंदला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कार्यालयात वेळत चहा न पोहोचवल्याबद्दल ही नोटीस आहे. चहावाल्यास फोनवरुन चहाची ऑर्डर देण्यात आली होती. मात्र, म्हशीचं दूध काढून आणल्यानंतर चहा घेऊन येतो, असे उत्तर बरमचंदने दिले होते. मात्र, हे उत्तर संतोषजनक नसल्याचे कारण देत ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामध्ये, आपलं उत्तर संतोषजनक नसून निष्काळजीपणाचं लक्षण आहे. त्यामुळे, यापुढे आपण म्हशीचं दूध अगोदरच काढून ठेवावे अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच, कार्यालयातून अधिकाऱ्यांचा फोन आल्यानंतर त्यांना वेळेत चहा उपलब्ध करावा, अशी ताकीदही दिली आहे.
दरम्यान, या व्हायरल नोटीससंदर्भात ब्लॉक को-ऑर्डिनेटरला विचारणा करण्यात आली. त्यावेळी, ही नोटीस पूर्णपणे फेक असून केवळ मजा-मजस्ती म्हणून कॉम्प्युटर ऑपरेटरने प्रिंट काढून चहावाल्यास दिल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या उत्तराने पुन्हा अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.