राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावरून भाजपात ट्विस्ट; वसुंधरा राजेंनी ठेवली एक अट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 01:39 PM2023-12-11T13:39:48+5:302023-12-11T13:42:16+5:30
३ डिसेंबरला राजस्थान निवडणुकीचा निकाल लागून बरेच दिवस झाले तरी अद्यापही मुख्यमंत्री कोण यावर चर्चा सुरू आहे
नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीतील वजनदार नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी भाजपाकडे अनोखी मागणी केली आहे. केंद्रीय नेतृत्वाने मला १ वर्षासाठी राजस्थानचं मुख्यमंत्री बनवावं अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यानंतर स्वत:आपण हे पद सोडू असं वसुंधरा राजेंनी भाजपा नेतृत्वाला सांगितल्याची माहिती सूत्रांकडून आली आहे. परंतु पक्षाकडून वसुंधरा राजे यांना विधानसभा अध्यक्ष बनवण्याची ऑफर दिली होती. मात्र पक्षाचा हा प्रस्ताव वसुंधरा राजेंनी नाकारला असं सांगितले जात आहे.
३ डिसेंबरला राजस्थान निवडणुकीचा निकाल लागून बरेच दिवस झाले तरी अद्यापही मुख्यमंत्री कोण यावर चर्चा सुरू आहे. वसुंधरा राजे यांनी भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्याकडेच मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे. तर नड्डा यांनी वसुंधरा राजेंना आमदारांसोबत वेगळी चर्चा न करण्याचा सल्लाही दिला. वसुंधरा राजे यांनी रविवारी रात्री जे.पी.नड्डा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. तेव्हा नड्डा यांनी त्यांना स्पीकर बनण्याची ऑफर केली त्यावर वसुंधरा राजेंनी नकार दिला.
बहुमताचा आकडा पार केला, तरी मुख्यमंत्री चेहऱ्यासाठी विलंब का?
राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपाने ११५ जागांवर विजय मिळवत बहुमताचा जादूई आकडा पार केला. परंतु एक आठवड्यानंतरही भाजपाकडून या राज्यात मुख्यमंत्री चेहरा देऊ शकली नाही. मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करताच भाजपात पक्षांतर्गत नाराजी उफाळून येण्याची भीती नेतृत्वाला आहे. त्याचा परिणाम भाजपाला भोगावा लागू शकतो. त्यामुळे भाजपाने ३ पक्ष निरिक्षक राजस्थानात पाठवले. त्यात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, खासदार सरोज पांडे आणि राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांचा समावेश आहे.
मंगळवारी भाजपा आमदारांची बैठक
भाजपा नेतृत्वाने पाठवलेल्या निरिक्षकांकडून मंगळवारी आमदारांची बैठक होणार आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता या बैठकीत राजस्थानच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. आमदारांसोबत चर्चा करून निरीक्षक अहवाल केंद्रीय नेतृत्वाकडे देतील. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची निवड होईल. राजस्थानात वसुंधरा राजे यांचा दबदबा आहे. त्या २ वेळा मुख्यमंत्री राहिल्या आहेत. निकालानंतर वसुंधरा राजेंनी आमदारांसोबत बैठका घेत त्यांचे महत्त्व वाढवले आहे. त्यामुळे राजस्थानात वसुंधरा राजेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाची संधी मिळणार का हे पाहणे गरजेचे आहे.