"तुम्ही लष्करातील जवानाला विवस्त्र करून का मारलं?’’, राज्यवर्धन सिंह राठोड पोलिसांवर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 12:06 PM2024-08-13T12:06:16+5:302024-08-13T12:07:14+5:30
Rajyavardhan Singh Rathore: तुम्ही लष्कराच्या जवानाला विवस्त्र करून का मारलं? तुम्ही लष्कराच्या जवानासोबत असं वागत असाल तर जनतेसोबत तुमची वागणूक कशी असेल, याची कल्पनाच केलेली बरी, असे राज्यवर्धन सिंह राठोड यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सुनावले.
राजस्थानमधील जयपूर येथील शिप्रापथ पोलीस ठाण्यामध्ये लष्करातील एका जवानाला पोलिसांनी केलेल्या मारहाणीचं प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. या मारहाणीच्या घटनेवरून राजस्थान सरकारमधील सैनिक कल्याण मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड आणि एसीपी संजय शर्मा यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली. या घटनेचा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राज्यवर्धन सिंह राठोड हे खूप संतप्त झालेले दिसत आहेत. तसेच त्यांची एसीपी संजय शर्मा यांच्यासोबत जोरात वाद घालताना दिसत आहे.
ही घटना शिप्रापथ पोलीस ठाण्यामध्ये घडली होती. तिथे पॅरा कमांडो अरविंद सिंह राजपूत यांना पोलीस कर्मचाऱ्यांनी कथितपणे मारहाण केल्याचा आरोप होत आहे. या मारहाणीप्रकरणी जाब विचारण्यासाठी सैनिक कल्याणमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी शिप्रापथ पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राज्यवर्धन सिंह राठोड हे एसीपी संजय शर्मा यांच्यासोबत सक्त भाषेमध्ये बोलताना दिसत आहेत. संजयजी तुम्ही लष्कराच्या जवानाला विवस्त्र करून का मारलं? तुम्ही लष्कराच्या जवानासोबत असं वागत असाल तर जनतेसोबत तुमची वागणूक कशी असेल, याची कल्पनाच केलेली बरी. मी तुमच्यासोबत बोलतोय आणि तुम्ही तिथे कुणासोबत बोलताय. मी इथे खूप धैर्याने बसलो आहे. जेव्हा तुमच्याशी बोललं जाईल, तेव्हा बोला, अन्यथा सावधान स्थितीत राहा. तुम्ही सामान्य शिस्तही शिकली नाही का? की गणवेशाचा वेगळाच रुबाब निर्माण झालाय? इथे दादागिरी सुरू आहे का? अशा शब्दात राठोड यांनी एसीपी महोदयांना सुनावले.
मिळालेल्या माहितीनुसार शिप्रापथ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी एखा हुक्का बारवर कारवाई केली होती. त्यादम्यान त्यांनी लष्कराच्या एका जवानालाही ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्या जवानाचा जामीन देण्यासाठी आलेले जवान अरविंद सिंह यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर या जवानाला पोलिसांनी विवस्त्र करून मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी राज्यवर्धन सिंह राठोड यांनी डीजीपींना फोन करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.