"कर्ज फेडा अन्यथा...", भाजप खासदाराला महिलेने दिली धमकी, अपशब्दही वापरले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 12:06 PM2023-09-29T12:06:45+5:302023-09-29T12:07:50+5:30
खासदार सुमेधानंद यांना कर्जवसुलीसाठी फोन करण्यात आला होता, असे याप्रकरणी पोलिसांनी सांगितले.
राजस्थानमधील सीकर येथील भाजप खासदार सुमेधानंद सरस्वती यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे. ही धमकी इतर कोणी दिली नसून एका फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या महिलेने दिली आहे. महिलेने खासदार सुमेधानंद यांना केवळ धमकीच दिली नाही तर त्यांच्यासोबत अपशब्दही वापरले. यानंतर खासदार सुमेधानंद यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
खासदार सुमेधानंद यांना कर्जवसुलीसाठी फोन करण्यात आला होता, असे याप्रकरणी पोलिसांनी सांगितले. तसेच, संबंधित महिलेने आरोप आहे की, एका व्यक्तीने तिच्या कंपनीकडून कर्ज घेतले होते. त्या व्यक्तीने कर्जाची वेळेवर परतफेड केली नाही. तसेच, कर्ज देताना खासदार सुमेधानंद सरस्वती यांना त्या व्यक्तीने जामीनदार बनवले होते. आता अशा स्थितीत जेव्हा ती व्यक्ती कर्जाची परतफेड करत नाही, तेव्हा जामीनदार म्हणून खासदारांना संपूर्ण कर्जाची परतफेड करावी लागेल, असा दावाही महिलेने केला.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती खासदार सुमेधानंद सरस्वती यांच्यावतीने पोलिसांना दिली आणि महिलेविरुद्ध दादिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ज्या मोबाईल नंबरवरून कॉल करण्यात आला होता, तो नंबरही खासदाराने पोलिसांना दिला. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, खासदार सुमेधानंद सरस्वती यांनी बुधवारी सायंकाळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी महिलेविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत.
गुरुग्राम येथील फायनान्स कंपनी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार सुमेधानंद सरस्वती यांना ज्या कंपनीतून फोन आला होता, ती कंपनी हरयाणातील गुरुग्राम येथील असून कंपनीने नाव लक्ष्मी फायनान्स कंपनी आहे. कंपनीच्यावतीने एका महिलेने खासदाराला फोन करून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती, त्यादरम्यान महिलेने खासदाराला अपशब्दही वापरले असे सांगण्यात येत आहे.
महिलेचा दावा खासदारांनी फेटाळला
दुसरीकडे, खासदार सुमेधानंद यांनी महिलेने केले दावा पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे. आपण कोणत्याही व्यक्तीचे जामीनदार नाही किंवा कर्ज घेणाऱ्याला मी ओळखत नाहीत, असे खासदार सुमेधानंद यांनी सांगितले. यासोबतच अशा बनावट कंपन्या ज्या प्रकारे फसवणूक करतात, लोकांना खोटे आरोप करून त्रास देतात, अशा बनावट कंपन्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, असेही खासदार सुमेधानंद म्हणाले.