आठवड्याचे राशीभविष्य - 8 ते 14 नोव्हेंबर 2020, 'या' राशीच्या व्यक्तींनी संताप अन् वाणीवर ठेवा संयम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 10:00 AM2020-11-09T10:00:09+5:302020-11-09T10:11:11+5:30

Weekly Horoscope 8 November to 14 November 2020 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

Weekly Horoscope 8 November to 14 November 2020 | आठवड्याचे राशीभविष्य - 8 ते 14 नोव्हेंबर 2020, 'या' राशीच्या व्यक्तींनी संताप अन् वाणीवर ठेवा संयम

आठवड्याचे राशीभविष्य - 8 ते 14 नोव्हेंबर 2020, 'या' राशीच्या व्यक्तींनी संताप अन् वाणीवर ठेवा संयम

Next

मेष 

 

आठवड्याच्या सुरुवातीस आपण जर धीराने व चिकाटीने कामे केलीत तर समस्यांचे निराकारण करण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकाल. कौटुंबिक समस्या किंवा प्रश्नांचे योग्य निराकरण झाल्याने कुटुंबातील वातावरणात आनंद पसरेल. ह्या आठवड्यात नवीन संबंध जुळविणे त्रासदायी होऊ शकते. ह्या दरम्यान इतर लोक आपली ईर्ष्या करू लागतील. व्यावसायिक जीवनातील काही क्षेत्रात अडथळे येण्याची शक्यता आहे. सभोवतालील लोक आपल्या मतांना गंभीरतेने घेतील. आठवड्याच्या अखेरीस आर्थिक नियोजन होण्याची शक्यता असून आपल्या व्यावसायिक भागीदारांमुळे आपल्या हातातील रोखीचे प्रमाण वाढेल. ह्या आठवड्यात आपणास नवीन प्रकल्प मिळण्याची किंवा आपण नवीन काम हाती घेण्याची सुद्धा शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात इच्छित प्रगती व यश मिळविण्यासाठी आठवड्याचा पूर्वार्ध जास्त अनुकूल आहे. प्रणयी जीवनासाठी सुद्धा पूर्वार्ध अनुकूल आहे. प्रेमाचा प्रस्ताव मांडू शकाल, मात्र शब्दात स्पष्टता असावी. विवाहितांना उत्तरार्धात जवळीक साधता येईल. आठवड्याच्या मध्यास आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. सुस्ती व आळसामुळे आपणास बेचैनी जाणवेल. पाठदुखी किंवा रक्तदाबातील चढ - उतार होण्याची शक्यता आहे.

वृषभ 

आठवड्यात आपण सुरुवातीस कुटुंबाकडे व नंतर व्यवसायाकडे अधिक लक्ष केंद्रित कराल. वरिष्ठ व सहकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध राहतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन आपल्या प्रगतीस कारणीभूत ठरू शकेल. जन्मभूमी पासून दूरवरच्या कार्यात थोडा विलंब होऊ शकेल. भागीदारांवर अति विश्वास ठेवू नये. विद्यार्थ्यांना सध्या इतर प्रवृतींकडे जरा कमी लक्ष देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. शिक्षणा संबंधित कोणताही निर्णय घेण्यात घाई करू नये. उत्तरार्धात शिक्षणा संबंधित बाबीत आपण अधिक सक्रिय व्हाल. धार्मिक उन्नतीसाठी धार्मिक ग्रंथांचे वाचन किंवा त्यावर चर्चा सुद्धा करू शकाल. आपल्या वैवाहिक जोडीदाराशी किंवा प्रियव्यक्तीशी वैचारिक देवाण - घेवाण करून समाधान प्राप्त कराल. वैवाहिक जोडीदारा कडून अधिक सहानुभूती मिळू शकेल. आपल्या मनात प्रेमाची भावना उफाळून आली तरी परस्पर विश्वासाची आवश्यकता असल्याचे आपण ध्यानात ठेवावे. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी - जास्त होण्याची शक्यता आहे. आपल्या क्षमतेहून अधिक काम करू नये. आठवड्याच्या उत्तरार्धात आपणास ऋतुगत विकार होण्याची शक्यता आहे. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी.

मिथुन 

आठवड्यात ग्रहांच्या अनुकूलतेमुळे बहुतांशी आपणास मानसिक शांतता लाभू शकेल. सुरवातीस आपल्या वाक्चातुर्याने लोकात आपली वेगळी ओळख निर्माण करून आपली कार्ये पार पाडू शकाल. आपण सर्जनात्मक, कलात्मक व आध्यात्मिक दृष्टीने प्रेरित व्हाल. संबंधांच्या बाबतीत आपण अधिक सक्रिय व्हाल. ह्या आठवड्यात व्यावसायिक हेतूने आपण एखादा छोटासा प्रवास करू शकाल. सुरवाती पासूनच विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित होऊ शकेल. ज्यांना दैनंदिन कार्यातून थोडी विश्रांती घेऊन आप्तांसह वेळ घालविण्याची इच्छा असेल किंवा त्यांच्यासह एखाद्या सहलीचे आयोजन करावयाचे असेल त्यांना त्यात यशस्वी होता येईल. कुटुंबियांच्या खुशीसाठी एखादी वस्तू खरेदी करण्यात किंवा आपल्या सभोवतालच्या वातावरणात सजावट करण्यासाठी आपण आठवड्याच्या मध्यास खर्च करू शकाल. आरोग्य उत्तम राहील, मात्र आधीपासूनच एखादी समस्या असल्यास किंवा एखादी समस्या सुरु झाल्यास सुरवातीसच त्याचा उपचार करावा, अन्यथा भविष्यात त्याचे रूपांतर मोठ्या समस्येत होऊ शकेल.

कर्क 

आठवड्याच्या सुरुवातीस आपण दैनंदिन कार्यांचे आयोजन युक्तिपूर्वक कराल. आपल्यात प्रगतीसाठी एक वेगळाच उत्साह बघावयास मिळेल. सुरवातीस आपल्या चेहेऱ्यावर अधिक तेज असल्याचे दिसून येईल. दिनचर्ये व्यतिरिक्त व्यक्तिगत छंदाचे महत्व समजून आपण स्वतःसाठी खरेदी, हिंडणे - फिरणे इत्यादींसाठी खर्च करण्याची शक्यता आहे. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने किंवा वसूली सदृश्य कार्ये उरकल्याने हाती पैसा खेळू लागेल. अशा परिस्थितीत आपण आर्थिक आयोजन उत्तम प्रकारे करू शकाल. ह्या आठवड्यात संबंधात अडकण्या ऐवजी आपण फक्त प्रेमालाप व मौजमस्ती करण्यासाठीच संबंध ठेवण्यात स्वारस्य दाखवाल. आपल्या वैचारिक शक्तीच्या जोरावर कोणत्याही समस्येचे निराकरण त्वरित करू शकाल. आपणास अधिक ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा असल्याने सतत काहीतरी नवीन शिकून घेण्यास आपण प्रयत्नशील राहाल. असे असले तरी काही मुद्दे समजून घेण्यासाठी आपणास इतरांच्या मार्गदर्शनाची गरज भासेल. सध्या आरोग्य उत्तम राहिले तरी सर्दी, कफ इत्यादी सामान्य समस्यांचा त्रास होऊ शकतो.

सिंह 

आठवड्याच्या सुरुवातीस स्थावरा संबंधी समस्या किंवा त्रास निर्माण होईल. आपली शांतता भंग पावत असल्याचे आपणास जाणवेल, तेव्हा आपण शांतिमय जीवन जगण्यासाठी काही न करता कामाच्या वेळेत काम करा व जेव्हा काहीच करत नसाल तेव्हा विश्रांती घ्या. नोकरीत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या मध्यास प्रवासाची संधी मिळेल. तसेच आप्तांच्या सहवासात वेळ घालवून जीवनातील सकारात्मकतेचा अनुभव घ्याल. वैवाहिक जीवनातील जवळीक वाढू शकेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदाराची भेट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या मध्यास व्यावहारिक बाबीत आपली सक्रियता वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात प्राप्तीत वाढ होण्यासाठी नवीन स्रोतांचा विचार आपण केल्यास किंवा सध्याच्या स्रोतात काही बदल केल्यास फायदा होऊ शकेल. वसुली किंवा कर्ज इत्यादी कार्यात आपण केलेल्या प्रयत्नांचे उत्तम फळ मिळू शकेल. विद्यार्थी त्यांच्या भावी अभ्यासाचे आयोजन ह्या आठवड्यात करू शकतील. सुरुवातीचे दोन दिवस वगळता बहुतांशी आपले आरोग्य उत्तम राहील.

कन्या 

आठवड्याच्या सुरुवातीस आपणास आर्थिक प्राप्ती होईल. आप्तांकडून भेटीच्या स्वरूपात किंवा अन्य प्रकारे लाभाची अपेक्षा आपण बाळगू शकता. आठवड्याच्या मध्यास आर्थिक बाबतीत सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ह्या आठवड्यात नोकरी - व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धा जाणवेल. आपल्या कार्यात अडथळा निर्माण करणाऱ्यांना आपण चांगला लढा देऊ शकाल. मानसिक ताण दूर करण्यासाठी वेळेनुसार आयोजन करावे. आठवड्याच्या उत्तरार्धात शासकीय, निम शासकीय कार्यात यश प्राप्त होईल. उत्तरार्धात आपल्या भिन्नलिंगी आकर्षणात वाढ झालेली दिसून येईल. प्रिय व्यक्तीच्या खुशीसाठी किंवा स्वतःसाठी आपण वस्त्रालंकार किंवा काही महागड्या वस्तूंची खरेदी करण्याची शक्यता आहे. विवाहेच्छुक व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाने योग्य व्यक्तीस आकर्षित करण्यात यशस्वी होऊ शकतील. संतती कडून लाभ होईल, मात्र त्यास विलंब झाल्याने आपल्या मनास थोडी काळजी वाटू शकते. विद्यार्थ्यांसाठी आठवड्याचे मधले दिवस वगळता इतर सर्व दिवस अनुकूल आहेत. आरोग्याच्या बाबतीत विशेषतः दात, जीभ, गळा किंवा खांद्याशी संबंधित समस्या होण्याची शक्यता आहे.

तूळ 

आठवड्याच्या सुरुवातीस व्यापाऱ्यांना आपल्या व्यापारात चांगला लाभ होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांना सुद्धा प्रगतीचे नवीन मार्ग दिसू लागतील. सध्या कामात नवीन प्रयोग करण्यात मागे न राहिल्यास त्याची उत्तम फळे मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यास शारीरिक व मानसिक विश्रांती मिळू शकेल. आपल्या जिवलग मित्रांसह व स्वजनांसह बाहेर फिरावयास जाऊन आपण अत्यंत आनंदित व्हाल. समाजात आपला मान - सन्मान होईल. व्यापाऱ्यांची वसुली होऊ शकेल. आपणास कुटुंबियांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. अनेक वर्षां नंतर जुने मित्र भेटल्याने जुन्या सुखद क्षणांच्या आठवणी ताज्या होतील. दि. ११ च्या दुपार पासून ते दि. १३ च्या दुपार पर्यंत आपल्या मनात विचारांचे काहूर माजल्याने आपली स्थिती काहीशी गोंधळाची होईल, तेव्हा त्यासाठी सुद्धा तयार राहावे लागेल. ह्या स्थितीचा प्रभाव आपल्या कामावर व संबंधांवर होताना दिसून येईल. आरोग्य बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे. उत्तरार्धात आपण पुन्हा उत्साहित व्हाल. वैवाहिक जीवनातील सानिध्य वाढेल. रुचकर भोजनाचा आस्वाद घेण्याची व नवीन वस्त्र खरेदी करण्याची संधी मिळेल. धन लाभ संभवतो.

वृश्चिक 

आठवड्याच्या सुरुवातीस आपण उत्साहित होऊन नियोजित कामे पूर्ण करू शकाल. आपले हितेच्छु व मित्र ह्यांचा सहवास मिळू शकेल. घर - वाहन ह्यांचे दस्तावेज बनवू शकाल व ते फायद्याचे ठरेल. वाटाघाटीत किंवा बौद्धिक चर्चे दरम्यान आपले म्हणणे इतरांना उत्तम प्रकारे समजावून देऊ शकाल. दूरवरचे संपर्क सध्या आपल्या प्रगतीस मोठा हातभार लावतील. त्यात आपले कौशल्य सिद्ध होऊ शकेल. ह्या आठवड्यात सरकारी कार्यात किंवा कायदेशीर बाबीत आपणास सावध राहावे लागेल. नोकरीत वरिष्ठांशी असलेल्या संबंधात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यास आपण प्रेम संबंध, सामाजिक कार्य, धार्मिक किंवा मंगल प्रसंगात व्यस्त राहाल. ह्यात काही ना काही लाभ मिळण्याची अपेक्षा आपण बाळगू शकता. विद्यार्थ्यांसाठी आठवड्याचे मधले दिवस अनुकूल आहेत. शेवटच्या दोन दिवसात कोणत्याही व्यक्तीशी वागताना सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. एखाद्या भांडणात समाधान करावयास जाताना किंवा कोणास जामीन राहताना त्यात स्वतः अडचणीत येण्याची शक्यता आहे. आरोग्याची सुद्धा विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

धनु 

आठवड्याच्या पहिल्या दिवशी आपण प्रियव्यक्ती, वैवाहिक जोडीदार व व्यावसायिक भागीदार किंवा नोकरीच्या ठिकाणचे आपले सहकारी ह्यांच्या सहवासात वेळ चांगला घालवू शकाल. इतरांचे सहकार्य आपल्यासाठी फायदेशीर ठरेल व त्यामुळे आपला आत्मविश्वास सुद्धा दुणावेल. मात्र, त्या नंतरचे दोन दिवस शारीरिक व मानसिक बेचैनीचे आहेत. अशा परिस्थितीत नाम स्मरण व आध्यात्मिकता आपल्या मनावरील ताण कमी करू शकेल. आरोग्य सुद्धा ठीक राहणार नाही. एखाद्याचे बोलणे आपल्या मनास लागून आपल्या भावना दुखावतील. अशा परिस्थितीत व्यावसायिक आघाडीवर मोठा निर्णय घेऊ नका. व्यवसायाच्या बाबतीत कोणावरही विसंबून राहू नका. कोणत्याही दस्तावेजावर स्वाक्षरी करण्यापूर्वी कागदपत्रांचा नीट अभ्यास करा. उत्तरार्धात व्यावसायिक प्रगतीची चांगली संधी मिळू शकेल. प्रेमीजनांना जोडीदारासह मनोरंजन स्थळ, चित्रपट किंवा खरेदीचा आनंद घेता येईल. दूरवर राहणाऱ्या व्यक्तीशी संपर्क वाढतील. उच्च शिक्षणासाठी उत्तरार्ध अधिक चांगला आहे. ह्या आठवड्यात विशेषतः तिखट, तेलकट तसेच बाहेरील पदार्थ खाणे न टाळल्यास आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

मकर 

आठवड्याच्या सुरुवातीस आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे आपणास एखाद्या चर्चेत सहभागी होण्याची इच्छा होईल. व्यावसायिक आघाडीवर वाटाघाटी होऊ शकतात. देशांतर्गत कार्यात आठवड्याच्या सुरवातीस व अखेरीस मोठे लाभदायी सौदे होऊ शकतील. खोळंबलेला माल उत्तरार्धात मिळण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात आपण व्यावसायिक प्रगतीवर लक्ष केंद्रित कराल. आठवड्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी कोणतेही नवीन कार्य करू नका. हे दोन्ही दिवस आपली स्थिती यथावत ठेवून आत्मचिंतन करण्याचे असल्याचे म्हणता येईल. ह्या दोन्ही दिवसात संबंधात सुद्धा काळजी घ्या. कौटुंबिक वातावरण सलोख्याचे राहील. कुटुंबियां द्वारा एखादा आर्थिक लाभ होण्याची शक्यता सुद्धा आहे. उत्तरार्धात आपल्या मधुर वाणीने इतरांची मने जिंकू शकाल. प्रिय व्यक्तीचा सहवास आपणास आनंदित करेल, मात्र संबंधातील परस्पर विश्वास टिकविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्गातील अडथळे उत्तरार्धात दूर होतील. आठवड्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी स्वभावातील उग्रतेमुळे आरोग्य विषयक समस्या उदभवू शकतात.

कुंभ 

आठवड्याच्या सुरुवातीस नोकरीतील कामात अनुकूलता वाढेल. पूर्वार्धात स्वतःच्या कामा व्यतिरिक्त सांघिक कार्यातील कामे करून सुद्धा आपले कौशल्य सिद्ध करून दाखवाल. आठवड्याच्या मध्यास मनाच्या व्याकुळतेमुळे कामात लक्ष लागणार नाही. मात्र, उत्तरार्धात नवीन उत्साह व जोमाने कामे करू शकाल. नशिबाची साथ मिळण्याची अपेक्षा बाळगू शकता. हा आठवडा आपण इतरांवर केलेल्या उपकारांचे व त्यांच्या केलेल्या कामाचे बक्षीस मिळण्याचा आहे. आठवड्याच्या सुरवातीस संबंधातील सौख्य सुद्धा उपभोगू शकाल. आपणास संबंधांचे मूल्य समजल्याने त्याची जपणूक करण्यास सुद्धा आपण शिकाल. आठवड्याच्या मध्यास आपली व्याकुळता किंवा वैचारिक गुंता प्रणयी जीवनात तणाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरेल. अशा स्थितीत शक्यतो संपर्क व एकमेकांची भेट टाळावी. अखेरच्या दिवशी आपण पुन्हा आपल्या जोडीदाराच्या सहवासात येऊ शकाल. स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्वार्ध तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अखेरचा दिवस अनुकूल आहे. ह्या आठवड्यात ऋतुजन्य विकार होण्याच्या शक्यतेमुळे आरोग्याची काळजी घ्यावी.

मीन 

संबंधांच्या बाबतीत आठवड्याची सुरुवात चांगली होऊन आपले विचार सकारात्मक होण्यास मदत होईल. ह्याचा फायदा आपणास व्यावसायिक आघाडीवर सुद्धा होईल. लहान भावंडांशी सलोखा निर्माण होईल. कोणताही कौटुंबिक निर्णय व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून न घेता भावनिक दृष्टिकोनातून घ्याल. कामाच्या ठिकाणी मात्र वास्तविकता बघूनच निर्णय घ्याल. आठवड्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी कामाच्या ठिकाणी आपले स्वतःचे कौशल्य सिद्ध करून प्रगतीचा मार्ग तयार करू शकाल. प्राप्तीच्या साधनात वाढ होईल. असे असले तरी गुंतवणूक करताना डोळसपणे विचार करावा. व्यावसायिक क्षेत्रातील परदेशी किंवा देशांतर्गत कार्यात थोडी अनिश्चितता राहील. आपली ऊर्जा योग्य प्रकारे वापरल्यास आपण नवीन क्षेत्र काबीज करू शकाल. आठवड्याच्या पूर्वार्धात विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला होईल, मात्र उत्तरार्धात इतर प्रवृतींकडे त्यांचे अधिक लक्ष जाईल. ह्या आठवड्यात पिता किंवा वडीलधारी, कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तसेच समाजातील प्रतिष्ठित लोकांशी असलेल्या संबंधात थोडी काळजी घ्यावी. आरोग्याच्या बाबतीत संपूर्ण आठवडाभर काळजी घ्यावी लागेल.

 

Web Title: Weekly Horoscope 8 November to 14 November 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.