खेडच्या साफसफाईसाठी १ कोटींचा निधी : एकनाथ शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:31 AM2021-07-29T04:31:28+5:302021-07-29T04:31:28+5:30
खेड : महापुरामुळे चिखलमय झालेल्या खेड शहराची साफसफाई करण्यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी १ कोटी रुपयांचा निधी ...
खेड : महापुरामुळे चिखलमय झालेल्या खेड शहराची साफसफाई करण्यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी रात्री खेड भागाला भेट दिल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.
आमदार योगेश कदम यांनी शहराच्या साफसफाईसाठी १ कोटी रुपयांची मागणी नगरविकास मंत्रालयाकडे केली होती. एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री खेडमध्ये दाखल झाले. खेड शहराची पाहणी केल्यानंतर त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या व्यापाऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शासकीय मदतीबाबत बोलताना ते म्हणाले की, कोकणात आलेल्या महापुरामुळे व्यापाऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या व्यापाऱ्यांना पुन्हा नव्याने आपला व्यवसाय उभा करण्यासाठी जी मदत लागेल ती मदत करण्यासाठी शासन या व्यापाऱ्यांची पाठीशी ठामपणे उभे राहील. विमा कंपन्यांशीही संपर्क साधून व्यापाऱ्यांना विमा क्लेम देण्याबाबत योग्य त्या सूचना केल्या जातील, असे आश्वासनही शिंदे यांनी यावेळी दिले. खेड येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करताना त्यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार योगेश कदम उपस्थित होते.