चिपळुणात व्हेल माशाची १० किलोची उलटी जप्त, चौघेजण ताब्यात; वनविभागाची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 03:15 PM2024-09-05T15:15:04+5:302024-09-05T15:15:31+5:30

चिपळूण : व्हेल माशाच्या १० किलो वजनाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या चौघांवर वनविभागाने मंगळवारी कारवाई केली. शहरानजीकच्या वालोपे येथे मुंबई ...

10 kg of whale vomit seized in Chiplun, four people in custody | चिपळुणात व्हेल माशाची १० किलोची उलटी जप्त, चौघेजण ताब्यात; वनविभागाची मोठी कारवाई

चिपळुणात व्हेल माशाची १० किलोची उलटी जप्त, चौघेजण ताब्यात; वनविभागाची मोठी कारवाई

चिपळूण : व्हेल माशाच्या १० किलो वजनाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या चौघांवर वनविभागाने मंगळवारी कारवाई केली. शहरानजीकच्या वालोपे येथे मुंबई गोवा महामार्गावर एच. पी. पेट्रोल पंपासमोर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. या चौघा संशयितांमध्ये एका व्यावसायिकासह बीएचएमएस डॉक्टरचाही समावेश आहे.

या प्रकरणी प्रकाश तुकाराम इवलेकर (६०), दिलीप पांडुरंग पाटील (५०, दोघेही रा. वेळवी ता. दापोली), प्रवीण प्रभाकर जाधव (४७, रा. मंडणगड), अनिल रामचंद्र महाडीक (४७, रा. अडखळ ता. मंडणगड) या चौघांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये कारवाई केली आहे.

गतवर्षी सलग दोन वेळा व्हेल माशाच्या उलटी प्रकरणी कारवाई झाली होती. त्यानंतर आता सर्वात मोठी कारवाई वनविभागाने केली आहे. व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीबाबतची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार मागील काही दिवसांपासून ट्रॅप तयार करण्यात आला होता. वनविभागाने एका बनावट ग्राहकाद्वारे संबंधित संशयितांकडे व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांना संबंधितांकडे व्हेल माशाची उलटी असल्याची खात्री पटली. त्यानुसार वालोपे येथे सापळा रचून या चौघांवर धडक कारवाई करीत त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सुमारे १० किलोची उलटी जप्त केली.

या घटनेत आणखी एका संशयिताचा समावेश असल्याची माहिती वनविभागाला मिळाली असून, त्याचाही शोध वनविभाग घेत आहे. संशयित म्हणून अटक केलेल्या चौघांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

या घटनेत जप्त केलेल्या व्हेल माशाच्या उलटीसोबतच संबंधितांनी वापरलेल्या दोन दुचाकी वनविभागाने जप्त केल्या आहेत. संशयित आरोपींवर वन्यजीव (सरंक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक आर. एम रामानुजम, विभागीय वनअधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी रं. शि. परदेशी, परिक्षेत्र वन अधिकारी फिरते पथक आर. आर. पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी दापोली प्र. ग. पाटील, सामाजिक वनीकरणचे वनक्षेत्रपाल एम. एम डबडे, एम. व्ही. पाटील, सा. स. सावंत, रा. द. खोत, एन. एस. गावडे, राहुल गुंठे, अशोक ढाकणे, राणबा बंबर्गेकर, सुरज जगताप, सुरज तेली, अरुण माळी, विशाल पाटील यांनी सहभाग घेतला.

Web Title: 10 kg of whale vomit seized in Chiplun, four people in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.