दापोलीतील कृषी महाविद्यालयमधील १० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, पुढील तीन दिवस ऑनलाईन क्लासेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 06:36 PM2022-01-05T18:36:52+5:302022-01-05T18:43:13+5:30
कृषी महाविद्यालयात एकूण १२० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील १० विद्यार्थ्यांच्या अँटीजन टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्या.
दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयात एकूण १२० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील १० विद्यार्थ्यांच्या अँटीजन टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत, अशी माहिती दापोली तालूका आरोग्य विभागाकडुन देण्यात आली आहे.
या विद्यार्थ्यांना सध्या विद्यापीठातील स्वतंत्र इमारतीमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून संबंधित विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस महाविद्यालयात ऑनलाईन क्लासेस सुरू राहणार आहेत. तशा सूचना डीन डॉ.महाडकर यांनी केल्या आहेत. आणि दहा जानेवारी नंतर या चाचणीचा रिपोर्ट आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिने योग्य तो निर्णय दिला जाईल, अशी माहिती विद्यापीठाचे प्रमुख विस्तार शिक्षण डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सर्दी तापाची लक्षणे आढळून आल्याने आरटीपीसीआर व अँटीजन टेस्ट घेण्यात आली. या मध्ये 10 विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आरटीपीसीआरचा अहवाल येणे बाकी आहे. पालक व विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विद्यापीठाकडून याबाबत दक्षता घेण्यात येत असून विद्यार्थ्याचे विलगीकरण करण्यात आले आहे.