पायाभूत आराखड्यासाठी १०५ कोटी

By Admin | Published: December 16, 2014 10:42 PM2014-12-16T22:42:59+5:302014-12-16T23:47:10+5:30

महावितरण कंपनी : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश

105 crore for infrastructure outlay | पायाभूत आराखड्यासाठी १०५ कोटी

पायाभूत आराखड्यासाठी १०५ कोटी

googlenewsNext

रत्नागिरी : महावितरणकडून पायाभूत आराखडा दोनचे नियोजन करण्यात आले आहे. या आराखड्यांतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १०५ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून नवीन उपकेंद्र बांधणी, उच्चदाब, लघुदाब वाहिन्या, ट्रान्स्फॉर्मरची कामे पूर्ण करण्यात येणार आहे.
यापैकी रत्नागिरी जिल्ह्यासाठी ६८ कोटी ६२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रत्नागिरी जिल्ह्यासाठी नवीन सहा उपकेंद्र मंजूर झाली आहेत. पायाभूत आराखडा एकमध्ये एकूण ८ उपकेंद्र मंजूर होती. पैकी पाच उपकेंद्र पूर्ण होऊन कार्यान्वित झाली आहेत. उर्वरित तीन उपकेंद्रांचे काम सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील शिरगाव, धामणंद व गुहागर येथील उपकेंद्रांची कामे सुरू आहेत. कुवारबाव, साखरपा, चांदोर, हर्णै, भूम येथील उपकेंद्र कार्यान्वित झाली आहेत. आराखडा दोनमध्ये कोतवडे, पानवल, लोटे एमआयडीसी (खेड), कोळवली (शिवणे), वालोपे (चिपळूण), पालघर (मंडणगड) येथे उपकेंद्र मंजूर झाली असून, त्यापैकी वालोपे उपकेंद्राला अद्याप जागा मिळालेली नाही. याशिवाय ३५२ किमी लघुदाब व ४१५ किमी उच्चदाब वाहिन्या, ३८२ नवीन रोहित्र बसविण्यात येणार आहेत. तसेच १५१ जुन्या रोहित्रांची क्षमता वाढवण्यात येणार आहे. काही उपकेंद्रात नवीन रोहित्र बसविली जाणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पायाभूत आराखडा दोनकरिता ३६ कोटी ८ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. पायाभूत आराखडा एकमध्ये जिल्ह्याला तीन उपकेंद्र मंजूर होती. पैकी जामसंडे उपकेंद्र सुरू झाले आहे, तर रामगड व आचरा उपकेंद्राची कामे अद्याप सुरू आहेत. याशिवाय आराखडा दोनमध्ये नवीन चार उपकेंद्र मंजूर झाली आहेत. फणसगाव (देवगड), भुईवाडा (वैभववाडी), माजगाव (सावंतवाडी), अडेरी (वेंगुर्ला) याठिकाणी उपकेंद्र प्रस्तावित आहेत. ५९२ किमी उच्चदाब, २६८ किमी लघुदाब वाहिन्या, ४३० नवीन रोहित्र बसविण्यात येणार आहेत. याशिवाय जुन्या ३५ रोहित्रांची क्षमता वाढविण्यात येणार आहेत.
कोकणात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतो. याशिवाय डोंगरदऱ्यातून वाहिन्या गेल्यामुळे पावसाळ्यात वाहिन्या तुटणे, रोहित्र बिघाड किंवा जळणे यासारख्या अनेक समस्या उद्भवतात. उपकेंद्रावर लगतची अनेक गावे विसंबून असल्यामुळे याचा फटका संबंधित गावांना बसतो. त्यामुळे महावितरणने फिडरवरील ताण कमी होण्यासाठी नवीन उपकेंद्रांना मंजुरी दिली आहे. चाफे उपकेंद्रावर गणपतीपुळे, मालगुंड, नेवरे, धामणसे, ओरी, जाकादेवीसह आसपासची गावे समाविष्ट होतात. कोतवडे उपकेंद्रामुळे चाफे उपकेंद्राचा भार काही प्रमाणात कमी होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 105 crore for infrastructure outlay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.