जिल्ह्यातील १०६ शाळा तौक्ते वादळामुळे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:34 AM2021-05-20T04:34:41+5:302021-05-20T04:34:41+5:30

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार तडाखा जिल्ह्याला बसला आहे. घरे, गोठे, बागायतींचे नुकसान झाले असतानाच, शाळांच्या इमारतींचीही पडझड झाली ...

106 schools in the district affected due to storm | जिल्ह्यातील १०६ शाळा तौक्ते वादळामुळे बाधित

जिल्ह्यातील १०६ शाळा तौक्ते वादळामुळे बाधित

googlenewsNext

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार तडाखा जिल्ह्याला बसला आहे. घरे, गोठे, बागायतींचे नुकसान झाले असतानाच, शाळांच्या इमारतींचीही पडझड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या १०६ शाळा वादळामुळे बाधित झाल्या असून ५१ लाख २३ हजार ३ रुपयांचे नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळात बाधित झालेल्या शाळांची डागडुजी रखडलेली असतानाच, आता तौक्ते वादळानेही शाळांना तडाखा दिला आहे.

रविवारी तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार तडाखा जिल्ह्याच्या किनारपट्टीलगतच्या गावांना बसला. सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये शाळांच्या जुन्या इमारती, छतावरील पत्रे, कौले तसेच संरक्षक भिंती, किचन शेडचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दापोली, चिपळूण आणि राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शाळांची कौले, पत्रे फुटले, तर काही ठिकाणी वाऱ्यामुळे उडून गेली. काही शाळांच्या इमारतींवर झाडे पडल्याने नुकसान झाले. फुटलेल्या छपरातून आलेले पाणी इमारतींमध्ये साचून राहिल्याने चिखल निर्माण झाला आहे.

लॉकडाऊनमुळे विद्यादान तसेच प्रशासकीय शालेय कामकाजही बंद आहे. त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. कौले फुटल्याने पावसाचे पाणी इमारतींमध्ये साचल्याने काही शाळांमधील पुस्तके व अन्य साहित्य भिजले आहे. त्यात शाळांचे ५१ लाखांचे नुकसान झाले आहे. गतवर्षी निसर्ग चक्रीवादळात दापोली, मंडणगड, गुहागर या तालुक्यांतील शाळांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी दुरुस्तीसाठी निधी अपुरा आला होता. यावर्षी तौक्ते वादळाची नव्याने भर पडली आहे. वादळामुळे नुकसानग्रस्त शाळांच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असल्याने यावर्षी जूनमध्ये सुरू होणारे शैक्षणिक सत्र ऑनलाईन असणार की ऑफलाईन, याबाबत संभ्रमच आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू होण्यापूर्वी बाधित शाळांच्या इमारतींची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ, पालकांमधून होत आहे.

..........................

जिल्ह्यातील तालुकानिहाय बाधित शाळा व शाळांचे नुकसान पुढीलप्रमाणे :

तालुका शाळा नुकसान

मंडणगड ४ ५ लाख ५० हजार

दापोली १७ १२ लाख २३ हजार

खेड १३ ३ लाख ७५ हजार

चिपळूण २२ ८ लाख ९० हजार ५००

गुहागर १४ ५ लाख ६९ हजार ५०३

रत्नागिरी ११ १० लाख १० हजार

संगमेश्वर ४ एक लाख ५२ हजार ५००

लांजा ६ २ लाख

राजापूर १५ एक लाख ५२ हजार ५००

एकूण १०६ ५१ लाख २३ हजार ३

Web Title: 106 schools in the district affected due to storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.