ssc exam: हुश्श.. संपली एकदाची परीक्षा; रत्नागिरीत विद्यार्थ्यांनी केला जल्लोष
By मेहरून नाकाडे | Published: March 25, 2023 06:02 PM2023-03-25T18:02:07+5:302023-03-25T18:05:57+5:30
परीक्षेस दि. २ मार्चपासून प्रारंभ झाला होता
रत्नागिरी : अखेर दहावीच्या परीक्षा निर्विघ्न पार पडल्याने विद्यार्थ्यांनी पेपर संपल्यानंतर शाळेच्या आवाराबाहेर येवून जल्लोष केला. ‘हुश्श, सुटलो एकदा बुवा’, असाच भाव विद्यार्थ्यांच्या चेहºयावर निर्माण झाला होता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेस दि. २ मार्चपासून प्रारंभ झाला होता. जिल्ह्यातून १९ हजार १९९ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. जिल्ह्यात ७३ परीक्षा केंद्र तर १३ परीरक्षक केंद्र होती. परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी सात भरारी पथके लक्ष ठेवून होती.
शेवटचा भूगोलाचा पेपर होता. शनिवारी दुपारी पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या बाहेर येवून जल्लोष केला. काही विद्यार्थ्यांनी दफ्तर, वह्या उंच आकाशात उडवित उड्या मारल्या तर काहींनी पाण्याच्या बाटल्यातील शिल्लक पाणी एकमेकांच्या अंगावर उडविले. काही विद्यार्थ्यांनी तर संध्याकाळी हॉटेलमध्ये जाऊन मनसोक्त खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.