मच्छिमारांसाठी खुशखबर! डिझेल परताव्याचे ११ कोटी मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 11:51 AM2023-08-11T11:51:10+5:302023-08-11T11:52:34+5:30
दोन दिवसात ही रक्कम मत्स्यव्यवसाय खात्याकडे येणार
रत्नागिरी : जिल्ह्यातील मासेमारी १ ऑगस्टपासून सुरू झाली असून, मासेमारीत कोणतीही अडचण येऊ नये आणि मच्छिमारांच्या डिझेलचा परतावा थोडा तरी त्यांना मिळावा, यासाठी राज्य सरकारकडून जिल्ह्याला ११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ते लवकरच जिल्ह्याला प्राप्त होतील, अशी माहिती मत्स्यव्यवसाय खात्याकडून देण्यात आली.
दोन दिवसात ही रक्कम मत्स्यव्यवसाय खात्याकडे येणार असून, ते पैसे लगेचच सोसायट्यांकडे वर्ग केले जाणार आहेत. अजूनही १९ कोटी रुपये येणे बाकी असून, तेही लवकरात लवकर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
मच्छिमारांना डिझेल परतावा मिळाल्यास त्यांचा व्यवसाय सुखकर होण्यास मदत होईल, यासाठी अधिवेशनानंतर हे पैसे तत्काळ वर्ग करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील समुद्रकिनारी असणाऱ्या सोसायट्या आणि तेथील मच्छिमारांना याचा लाभ होणार असून, राज्य सरकारकडून आतापर्यंत जास्तीत जास्त परतावा देण्यात आला आहे. पूर्वी ६० कोटींचा डिझेल परतावा येणे बाकी होते. परंतु, मुख्यमंत्री शिंदे तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे अधिवेशनानंतर तत्काळ हा परतावा मिळण्यास मदत झाली आहे.