जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने ११ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:32 AM2021-03-17T04:32:36+5:302021-03-17T04:32:36+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ११ रुग्णांची नव्याने भर पडली असून, आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या १०,२५२ इतकी झाली आहे. ...
रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ११ रुग्णांची नव्याने भर पडली असून, आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या १०,२५२ इतकी झाली आहे. मंगळवारी पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये १० रॅपिड अँटिजन आणि एक आरटीपीसीआर अहवालात पाॅझिटिव्ह आलेल्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोराेना रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. मंगळवारी जिल्हा रुग्णालयाकडून आलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात ११ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. ४०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बरे झालेल्या ५४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. बरे होणाऱ्यांची टक्केवारी ९५ टक्के इतकी असून, मृत्यूची टक्केवारी ३.६१ टक्के इतकी आहे.
मंगळवारी पाॅझिटिव्ह आलेल्या ११ रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ५, दापोली ४ आणि खेड, गुहागर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या शून्य आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १०,२५२ इतकी झाली असून, ३७० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विविध रुग्णालयांमध्ये सध्या ११६ रुग्ण उपचार घेत असून, त्यापैकी ४६ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.
आतापर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये एकूण ८९,१९५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर आतापर्यंत ९,७४७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या शिमगोत्सवात वाढण्याचा धोका असल्याने, आरोग्य विभागाकडून कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, लसीकरणाचा वेगही आता वाढविण्यात येत आहे. त्यासाठी सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयातही लसीकरण केले जात आहे.