ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची ११३ अंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 02:22 PM2022-01-21T14:22:23+5:302022-01-21T14:22:40+5:30
वेत्ये येथील कासवांच्या अंड्याचे यावर्षीचे दुसरे घरटे झाले आहे.
राजापूर : तालुक्यातील वेत्ये येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची ११३ अंडी सापडली आहेत. कासवमित्र गोकुळ जाधव यांनी वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली किनाऱ्यावर घरटे करून योग्य पद्धतीने त्यांचे संवर्धन केले आहे. वेत्ये येथील कासवांच्या अंड्याचे यावर्षीचे दुसरे घरटे झाले आहे.
यावर्षीच्या शुभारंभाला वेत्ये किनारी यावर्षीचे पहिले कासवाच्या अंड्यांचे घरटे झाले. त्यानंतर आंबोळगड समुद्र किनारीही कासवाची अंडी आढळून आली. त्यानंतर आज पुन्हा एकदा वेत्ये समुद्र किनारी कासवाची अंडी आढळून आली आहेत. आज पहाटेच्या वेळी समुद्र किनारी नेहमीप्रमाणे फेरफटका मारत असताना कासवमित्र जाधव यांना वाळूमध्ये कासवांच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसले. त्या पावलांच्या ठशांच्या अनुषंगाने पाहणी केली असता त्यांना कासवाची अंडी आढळून आली.
याबाबत त्यांनी तात्काळ राजापूर वन विभागाचे वनपाल सदानंद घाटगे, सागर गोसावी आदींशी संपर्क साधून त्याबाबतची माहिती दिली. त्यानंतर किनाऱ्यावरील वन्यप्राणी वा जंगली श्वापदांपासून त्या अंड्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली अंड्यांचे सुरक्षित ठिकाणी संवर्धन करून ठेवण्यात आले आहे. त्यातून वेत्ये किनारी यावर्षीचे कासवांच्या अंड्याचे दुसरे घरटे झाले आहे. या अंड्यामधून आता सुमारे पंचावन्न दिवसांनी पिल्ले बाहेर येणार आहेत.