रत्नागिरी जिल्हा गुंतवणूकदार समिटमधून ११४५ कोटींचे उद्योग; ४ हजार रोजगार निर्मिती होणार
By शोभना कांबळे | Published: March 7, 2024 05:51 PM2024-03-07T17:51:00+5:302024-03-07T17:51:13+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा गुंतवणूकदार समिटमधून स्थानिक स्तरावर जिल्ह्यात ११४५ कोटींची गुंतवणूक होऊन, त्यामधून ४ हजार रोजगार निर्मिती होणार ...
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा गुंतवणूकदार समिटमधून स्थानिक स्तरावर जिल्ह्यात ११४५ कोटींची गुंतवणूक होऊन, त्यामधून ४ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. प्रदूषण विरहीत आणि हजारो हातांना काम देणाऱ्या प्रकल्पांना समर्थन देण्यासाठी समिती निघाव्यात, अशी अपेक्षा उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.
उद्योग संचालनालयाच्यावतीने आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या समन्वयाने येथील हाॕटेल सावंत पॅलेसमध्ये गुरूवारी रत्नागिरी जिल्हा गुंतवणूकदार समिटचे उद्घाटन उद्योग मंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक प्रशांत पटवर्धन, सिंधुदूर्ग जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, माजी नगराध्यक्ष राहूल पंडित आदी उपस्थित होते.
उद्योग मंत्री सामंत यावेळी म्हणाले की, १ कोटींचा उद्योग करणाऱ्या उद्योजकालाही रेड कार्पेट असले पाहिजे, ही प्रामाणिक भावना आहे. महाराष्ट्र शासनाने स्थानिक उद्योजकांना देखील रेड कार्पेट दिलं आहे, हे दाखवणारा हा कार्यक्रम आहे. बाळासाहेब ठाकरेंचं असं सांगणे होते, नोकरी करणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे निर्माण करावेत. यामधून राज्याचं आर्थिक उत्पन्न वाढलं जाईल. ११४५ कोटींचे सामंजस्य करार या समिटच्या माध्यमातून करत आहोत. रायगडमध्ये २ हजार कोटींचे , उद्या कोल्हापूरमध्ये साडेतीन हजार कोटींचे आणि संध्याकाळी बारामतीमध्ये २ हजार कोटींचे करार करतोय. एकूणच १ लाख कोटींची गुंतवणूक एमएसईमीमध्ये स्थानिक उद्योजक करत आहेत.
दावोसमध्ये ३ लाख ७२ हजार कोटींचे सामंजस्य करार झाले. त्यापैकी निम्म्या प्रकल्पांना जागाही दिली. ह्युंदाई कंपनी ७ हजार कोटींची गुंतवणूक पुण्यामध्ये करत आहे आणि ३ हजार कोटी स्माॕल स्केल इंडस्ट्रीजमध्ये करत आहे. परदेशी थेट गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याने पहिला क्रमांक सोडला नाही. स्टरलाईटची ५०० एकर एमआयडीसीची जागा रत्नागिरीच्या पुन्हा ताब्यात येईल. डीफेन्स एक्स्पोला २०० एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरीत शस्त्रं तयार होतील.
टाटा कंपनी १९१ कोटी खर्च करून रत्नागिरीत प्रशिक्षण केंद्र उभारत आहे. देशातला सर्वात मोठा जेम्स ॲण्ड ज्वेलरीचा सर्वात मोठा पार्क नवी मुंबईत होत आहे. त्यासाठी २१ एकर जागा दिली आहे. यातून १ लाख मुलांना नोकरी मिळणार आहे. त्याचबरोबर पुढील दीड महिन्यात रत्नागिरीत जेम्स ॲण्ड ज्वेलरीचे प्रशिक्षण सुरु होत असल्याची माहितीही उद्योग मंत्री सामंत यांनी यावेळी दिली.
यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात उद्योग मंत्र्यांच्या हस्ते गुंतवणूकदारांना करारपत्र वितरण करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. हणबर यांनी स्वागत प्रास्ताविक केले. अभिजीत गोडबोले यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.