कुणबी पतपेढीच्या व्यवसायात १२ कोटींची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:30 AM2021-03-26T04:30:40+5:302021-03-26T04:30:40+5:30

राजापूर : कोरोना काळातही सर्वांनी केलेल्या प्रामाणिक कामामुळे राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या एकत्रित व्यवसायात ...

12 crore increase in business of Kunbi Credit Bureau | कुणबी पतपेढीच्या व्यवसायात १२ कोटींची वाढ

कुणबी पतपेढीच्या व्यवसायात १२ कोटींची वाढ

googlenewsNext

राजापूर : कोरोना काळातही सर्वांनी केलेल्या प्रामाणिक कामामुळे राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या एकत्रित व्यवसायात १२ कोटींची वाढ झाल्याची माहिती वार्षिक सभेत देण्यात आली. बुधवारी ऑनलाईन पार पडलेल्या २६ व्या वार्षिक अधिमंडळ बैठकीत सभासदांना लाभांश वाटपाला मंजुरी देण्यात आली.

कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता, शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार झुम अ‍ॅपद्वारे ऑनलाईन पद्धतीने ही बैठक पार पडली. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सुमारे ११५ सभासद उपस्थित होते. यावेळी विषय पत्रिकेवरील विविध १३ विषयांवर चर्चा होऊन विविध विषयांना आवाजी मतदानाने मंजुरी देण्यात आली. संस्थेच्या प्रधान कार्यालयातून या बैठकीचे ऑनलाईन लाईव्ह सादरीकरण करण्यात आले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बाळ तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर उपस्थित होते. २१ मार्च २०२० अखेरचा वार्षिक अहवाल, नफा-तोटा पत्रक, ताळेबंद वाचून दाखविण्यात आले. २०१९-२० या आर्थिक वर्षात संस्थेने साधलेल्या आर्थिक प्रगतीचा आढावा पाटकर यांनी घेतला. या आर्थिक वर्षात एकत्रित व्यवसायात १२ कोटींनी वाढ होऊन एकत्रित व्यवसाय ५० कोटी रुपये झाल्याचे सांगितले. सभासद वाढ, कर्जवाटप, कर्जवसुली, ठेवी अशा सर्वच आघाडीवर पतसंस्थेने दर्जेदार कामगिरी करत ऑडिट वर्ग ‘अ’ मिळवल्याची माहिती दिली.

या अहवाल वर्षात संस्थेला ४१ लाख ३९ हजार रुपये इतका निव्वळ नफा झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. सभासदांना लाभांश देण्यालाही मान्यता देण्यात आली. सन २०२०-२१चे वार्षिक अंदाजपत्रक सभेपुढे सादर करण्यात आले. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. कार्यक्षेत्राचा विस्तार करताना काही नव्या शाखा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. संस्थेची विविध माध्यमातून बदनामी केल्याचा ठपका ठेवून भास्कर कुवळेकर, अशोक घुमे व मोहन घुमे यांचे सभासदत्व रद्द करण्याबाबत विचारविनिमय व्हावा, असा विषय अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी सर्वांसमोर ठेवला. या सभासदांना म्हणणे मांडण्याची संधी देताना आवाजी मतदानाने त्यांचे सभासदत्व रद्द करण्याला मंजुरी देण्यात आली. याप्रकरणी कुवळेकर व घुमे यांनी आपले आक्षेप नोंदवले.

कोरोनासारखे संकट असतानाही अधिकारी, कर्मचारी आणि संचालक मंडळ यांच्या अथक प्रयत्नांतून संस्था पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्यातूनच संस्थेची आजवरची आर्थिक प्रगती होऊ शकल्याचे अध्यक्षीय भाषणात प्रकाश मांडवकर यांनी सांगितले.

Web Title: 12 crore increase in business of Kunbi Credit Bureau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.