रत्नागिरी जिल्ह्यातील १२ हजार ६१३ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:06 PM2018-06-27T18:06:10+5:302018-06-27T18:08:58+5:30
‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेत जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ३४ लाखाची कर्जमाफी मिळाली असून, अद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत.
रत्नागिरी : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेत जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ३४ लाखाची कर्जमाफी मिळाली असून, अद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत.
सन २०१२ ते २०१६ असे सलग चार वर्षे अपुरा पाऊस झाल्यामुळे खरीप, रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यामुळे अनेक शेतकरी पीककर्जाची परतफेड करू शकले नाहीत. राज्य शासनाने २०१७ मध्ये थकीत कर्जदारांसाठी कर्जमाफी जाहीर केली.
या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रूपयांपर्यंत कर्जमाफी, दीड लाखांवरील शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रूपयांचा प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते.
सन् २००९ - १० ते २०१५ - १६ या कालावधीत कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६पर्यंत थकबाकीदार असतील, त्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला होता.
शासन निर्णयानुसार, जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांनी जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची राज्य शासनाने पुरवलेल्या कॉलम १ ते ६६ नमुन्याप्रमाणे आॅनलाईन माहिती भरून दिली होती.
जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांचे मिळून ६१ हजार ४४१ शेतकरी कर्जदार आहेत. त्यातील ४७ हजार १९४ शेतकऱ्यांनी १५ सप्टेंबरपर्यत कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केल्याने ते पात्र ठरले होते.
पात्र शेतकऱ्यांची माहिती भरून घेण्यात आली. राज्य शासनाकडून केलेल्या छाननीत जून २०१८ पर्यंत ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांचे ६७ कोटी ३४ लाखांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. अद्याप १२ हजार ६१३ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही. या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरु आहे.
सन २००१ ते २००९ या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. परंतु त्या कालावधीत झालेल्या कर्जमाफीचे लाभार्थी झाले नाहीत, अशा पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा शासनाने केली होती, त्याची ही प्रक्रिया सुरू झाली.
नव्याने कर्जवाटप सुरु
नव्या खरीप हंगामासाठी एप्रिलपासून जिल्ह्यात कर्जवितरण सुरू झाले आहे. जिल्ह्यातील ३० हजार ५०६ शेतकऱ्यांना ४० कोटी ८८ लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.