बारा हजार किलो काळा गूळ जप्त

By admin | Published: June 19, 2017 12:39 AM2017-06-19T00:39:55+5:302017-06-19T00:39:55+5:30

दोघांना अटक; ट्रक जप्त; उत्पादन शुल्कची चिपळुणात कारवाई

12 thousand kilos of black jug seized | बारा हजार किलो काळा गूळ जप्त

बारा हजार किलो काळा गूळ जप्त

Next

रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्कच्या रत्नागिरी विभागाने चिपळूण तालुक्यातील उमरोली येथे रविवारी पहाटे पाठलाग करून काळ्या गुळाची वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला. त्यातील १२ हजार किलो काळा गूळ जप्त करण्यात आला. ट्रकचालक बलभीम देवेंद्र नायकोडी (३१, खेड, चिपळूण) व गावठी दारू बनविणारी महिला योजिता यशवंत हळदणकर (४०, रा. बोरगाव, चिपळूण) यांना अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाच्या अधीक्षक म्हणून हजर झालेल्या संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील गावठी दारूधंद्यांविरोधात मोहीम सुरू झाली आहे. विभागाच्या भरारी पथकामार्फत शनिवारी मध्यरात्रीनंतर महामार्गावर गस्त सुरू असताना उमरोली येथील एका पेट्रोल पंपासमोरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकबाबत संशय आला. पथकाने पाठलाग करून ट्रक थांबवला. त्यात गावठी दारूसाठी लागणारा काळा गूळ आढळून आला.
या ट्रकचा चालक नायकोडी याला याबाबत विचारले असता त्याच्याकडे गुळाच्या वाहतुकीचा परवाना नव्हता. ट्रकमध्ये प्रत्येकी २० किलोच्या ६०० ढेपा मिळून ४ लाख ८० हजार रुपये किमतीचा १२ हजार किलो गूळ आढळून आला. अधिक तपास करता हा गूळ चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथे गावठी दारूची निर्मिती करणाऱ्या योजिता हळदणकर हिच्याकडे तो घेऊन चालला होता. त्यामुळे हळदणकर या महिलेलाही अटक करण्यात आली.
गुळाबरोबरच ट्रकही (क्रमांक एमएच ०८ डब्ल्यू ८७३९) जप्त करण्यात आला आहे. याशिवाय हळदणकरच्या घरावर छापा टाकला असता तेथे प्रत्येकी २०० लीटरचे गूळ, नवसागर रसायनाने भरलेले १० प्लास्टिक बॅरल्स व गावठी दारूने भरलेले प्रत्येकी २० लीटरचे दोन कॅन व भट्टीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. हा एकूण ४६,८०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक प्रमोद कांबळे, दुय्यम निरीक्षक प्रेमसिंग राठोड, खेड विभागाचे प्रभारी निरीक्षक महेश शेंडे, चिपळुणचे प्रभारी निरीक्षकएन. एम. शेख, सहायक दुय्यम निरीक्षक विजय हातिसकर तसेच जवान वैभव सोनावले, निनाद सुर्वे, विशाल विचारे, अतुल वसावे, राजेंद्र भालेकर, संदीप विटेकर, अर्शद शेख, सावळाराम वड, महिला कॉन्स्टेबल अनिता नागरगोजे उर्फ डोंगरे सहभागी झाले होते.

Web Title: 12 thousand kilos of black jug seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.