तब्बल १२० वर्षांच्या लक्ष्मी आजींचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:33 AM2021-05-06T04:33:04+5:302021-05-06T04:33:04+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील घोडवली गावातील गवळीवाडीमध्ये राहणाऱ्या लक्ष्मी सखाराम भोजने या १२० व्या वर्षांच्या आजीने साऱ्यांचा निरोप ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील घोडवली गावातील गवळीवाडीमध्ये राहणाऱ्या लक्ष्मी सखाराम भोजने या १२० व्या वर्षांच्या आजीने साऱ्यांचा निरोप घेतला. फेब्रुवारी महिन्यातच त्यांचा १२० वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. आताच्या घडीला जिल्ह्यातील त्या सर्वांत वयस्क होत्या.
३ मे रोजी सायंकाळी ही घटना घडली. १७ फेब्रुवारी १९०१ रोजी जन्मलेल्या लक्ष्मी भोजने यांचे माहेर संगमेश्वर तालुक्यातील चांदिवणे गवळीवाडी येथे होते. घोडवली येथील सखाराम भोजने यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्यांचे नाव 'लक्ष्मी' ठेवले गेले. खरोखरच त्या भोजने घराण्यात लक्ष्मी बनून आल्या. कष्टातून त्यांनी भोजने घराण्याचा उत्कर्ष केला. लहानपणापासूनच शेतीची आवड असल्याने लक्ष्मी यांनी स्वतःला शेतीच्या विविध कामांत झोकून दिले. भातशेतीबरोबरच नाचणी, वरी, खामडी अशी विविध प्रकारची शेती त्यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत अनेक वर्षे केली. त्यांना ४ मुले आणि ३ मुली आहेत.
पती निधनानंतर खचून न जाता, संसाराची सारी सूत्रे लक्ष्मी यांनी स्वत:कडे घेतली आणि त्यात त्या यशस्वीही झाल्या. मुलांना शक्य झाले तेवढे शिक्षणही त्यांनी दिले. मुलांनीही शिक्षण घेताघेता शेतीत मदत केली. नोकरी-व्यवसायानिमित्त मुले शहराकडे गेली. मुला-मुलींचे लग्न झाल्यानंतर प्रत्येकाचा संसार सुरू झाला. पुढे नातवंडे झाली. मात्र सारे कुटुंब लक्ष्मी यांची विचारपूस करून त्यांना आदराची वागणूक देत होते. मुलांकडून चार पैसे हातात येऊ लागले म्हणून लक्ष्मी यांनी शेती करणे सोडले नाही. त्यातच त्यांच्या चार मुलांपैकी दोन मुलांचे निधन झाले. तरीही खचून न जाता लक्ष्मी यांनी आपली कष्टप्रद वाटचाल सुरूच ठेवली. कष्ट हेच त्यांच्या निरोगी आरोग्याचे रहस्य ठरले. किरकोळ आजाराव्यतिरिक्त कोणताही गंभीर आजार नसलेल्या लक्ष्मी भोजने यांनी २००१ मध्ये वयाची १०० वर्षे पूर्ण केली. त्यावेळी सर्व कुटुंबाने जल्लोषात त्यांचा शतकोत्सव साजरा केला होता.
वयाची शंभरी गाठूनही लक्ष्मी या घरातील कामे करीतच होत्या. गेल्या पाच-सहा वर्षांत वयोमानानुसार ऐकू कमी येणे, नजर कमी येणे, असे प्रकार जाणवू लागले होते. मात्र, शेवटपर्यंत त्या स्वतःची सर्व कामे स्वतः करीत होत्या. ३ मे रोजी सायंकाळी त्यांचे निधन झाले. अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.