१२ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन येत्या सोमवारपासून रत्नागिरीत
By मेहरून नाकाडे | Published: February 3, 2024 06:47 PM2024-02-03T18:47:01+5:302024-02-03T18:49:45+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेतर्फे १२ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन सोमवार दि. ५ ते बुधवार ...
रत्नागिरी : महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेतर्फे १२ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन सोमवार दि. ५ ते बुधवार दि. ७ फेब्रुवारी या कालावधीत स्वयंवर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनासाठी महाराष्ट्रातून सात ते आठ हजार वारकरी रत्नागिरीत येणार आहेत.
संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन सोमवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. माजी संमेलनाध्यक्ष ह.भ.प तुकाराम महाराज ठाकूर बुवा (दैठणकर) यांच्याकडून संमेलन अध्यक्षपदाची सूत्रे ह.भ.प.माधवमहाराज शिवणीकर (भक्त पुंडलीक फड प्रमुख) स्विकारणार आहेत.
यानंतर महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेतर्फे श्री विठ्ठल पुरस्काराचे वितरण आयोजित केले आहे. वारकरी संप्रदायाचे फडकरी बांधवांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश पास मंजूर केल्याबद्दल पाच किलो चांदीची श्री विठ्ठलाची मूर्ती देवून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याबाहेरून संप्रदायासाठी योगदानाबद्दल संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा प्रमुख श्रीमंत सरदार उर्जितसिंह राजे शितोळे (अंकलीकर) यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.
पंढरपूर येथील फडकरी दिंडीकरी संघटनेचे सचिव ह.भ.प मनोहरमहाराज आैटी यांना वारकरी संप्रदायाच्या विशेष सेवेसाठी जीवन गाैरव पुरस्कार देवून गाैरविण्यात येणार आहे. वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ पाईक म्हणून वै.ह.भ.भ.प भानुदास महाराज ढवळीकर यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार ह.भ.प देविदास महाराज ढवळीकर स्विकारणार आहेत.
दुपारी १ वाजता दिंडी, सायंकाळी ४ वाजता जगद् गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प बापूसाहेब महाराज देहूरकर यांचे किर्तन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता महिला भजनी मंडळातर्फे सामूदायिक हरिपाठ होणार आहे.