रत्नागिरी जिल्ह्यातील आठ पर्यटन स्थळांसाठी तब्बल १३ कोटी रुपये मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 11:43 AM2023-12-22T11:43:26+5:302023-12-22T11:44:01+5:30
रत्नागिरी : पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत सन २०२३-२४ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आठ पर्यटन स्थळांच्या ठिकाणी ...
रत्नागिरी : पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत सन २०२३-२४ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आठ पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी १३ कोटींच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी ३ कोटी ८९ लाख ९९ हजार एवढा निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे वितरित करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळांकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. मात्र, या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा अद्याप मिळत नसल्याने पर्यटकांची इच्छा असूनही त्यांना या पर्यटनस्थळी थांबता येत नाही. त्यामुळे पर्यटक फारसे रत्नागिरी जिल्ह्यात न थांबता पुढे सिंधुदुर्ग किंवा गोव्याकडे सुटी घालविण्यासाठी जात असल्याचे दिसून येते.
मात्र, जिल्ह्यात पर्यटन वाढावे, इथल्या पर्यटन स्थळांचा विकास व्हावा, यादृष्टीने शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून जिल्ह्यातील प्रमुख ८ कामांसाठी १३ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यातील ३ कोटी ८९ लक्ष ९९ हजार एवढा निधी सन २०२३-२४ मध्ये जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.
यात सात स्थळे रत्नागिरी तालुक्यातील आहेत. तसेच संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर परिसराचा समावेश आहे. या आठ पर्यटन स्थळांच्या परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटकांना या पर्यटन स्थळांचा आनंद घेता येणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी राहण्याचा आनंदही मिळणार आहे. या पायाभूत सुविधांसाठी काही प्रमाणात जिल्हाधिकारी यांच्याकडे निधी उपलब्ध झाल्याने कामेही लवकरच सुरू होतील.