१४८३ मृत खातेदारांचा शोध

By Admin | Published: September 7, 2014 10:48 PM2014-09-07T22:48:52+5:302014-09-07T23:19:48+5:30

चावडी वाचन : जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार उपक्रम

1483 deceased account holders' search | १४८३ मृत खातेदारांचा शोध

१४८३ मृत खातेदारांचा शोध

googlenewsNext

चिपळूण : गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ आपल्या गावी येत असतात. त्यामुळे जमिनीबाबत ज्याकाही तक्रारी असतील त्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष चावडी वाचन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात १४८३ मयत खातेदारांचा शोध घेण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनानुसार तहसीलदार वृषाली पाटील यांच्या अधिपत्याखाली चिपळूण तहसील कार्यालयाअंतर्गत ९ मंडळांमधील ५४ सजांच्या कार्यक्षेत्रात ६७ गावांमध्ये सुवर्ण जयंती राजस्व अभियानअंतर्गत गणपती स्पेशल चावडीवाचन कार्यक्रम २ व ३ सप्टेंबर रोजी यशस्वीरित्या राबविण्यात आला. चावडी वाचन कार्यक्रमाला परगावातील नागरिक व स्थानिक ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद होता. या कार्यक्रमात गावी असलेल्या सर्व ७/१२ चे वाचन करुन त्यामध्ये वारस तपास न झालेल्या एकूण १४८३ मृत खातेदारांचा शोध घेण्यात आला. या मृत खातेदारांचा वारस तपास करण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी मयत खातेदाराचा मृत्यूदाखला व त्यांच्या कायदेशीर वारसांची नावे, वय व सध्या वास्तव्याचा पत्ता असलेले रजिस्टर एडीचे लखोटे घेऊन विहीत नमुन्यातील अर्जासह संबंधित तलाठी यांच्याकडे देण्यात यावेत. यानुसार वारस तपासाची फेरनोंद घेण्यात येईल. संबंधितांनी वारस तपास करुन कायदेशीर वारसांची नोंद करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले.
७/१२ च्या इतर हक्कातील नोंदीबाबत आक्षेप असल्यास ते नोंदवून घेणे व विहीत पद्धतीने दुरुस्त करण्याचे कामकाज, सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे, शर्तभंग प्रकरणे, देवस्थान, इनामाच्या जमिनीची माहिती, वतन जमिनी वर्ग २ बाबत अनियमितता शोधण्याबाबत कार्यवाही करण्यात आली. भेटीच्यावेळी ७/१२ व ८ (अ)च्या उताऱ्यांची ज्यांनी मागणी केली त्यांना ते त्याचवेळी देण्याची कार्यवाही करण्यात आली. तसेच नागरिकांना त्यांचे जमिनीसंदर्भात आवश्यक माहिती, ७/१२ बाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागात अनेक खातेदारांचे विविध प्रश्न विचारले जातात. मात्र, या उपक्रमामुळे महसूलचे प्रश्न त्यातून सुटले, असे सांगण्यात आले.
हा उपक्रम जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, नायब तहसीलदार सुजाता पाटील, निरीक्षक केतन आवले यांच्या पर्यवेक्षणाखाली मंडल अधिकारी, तलाठी यांनी यशस्वीरित्या राबविला. (प्रतिनिधी)

Web Title: 1483 deceased account holders' search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.