मधमाशांच्या हल्ल्यात १५ जखमी
By admin | Published: March 15, 2015 12:17 AM2015-03-15T00:17:10+5:302015-03-15T00:17:37+5:30
भेडशी खालचा बाजार येथील घटना : भीतीने काही ग्रामस्थांच्या नदीत उड्या
साटेली भेडशी : भेडशी-खालचा बाजार येथील दामोदर मंदिराशेजारील कॉजवेजवळ असलेल्या एका मोठ्या झाडावरील मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने पंधराजण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. या सर्व जखमींवर साटेली-भेडशी येथील आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. तर यातील प्रमिला गवस या महिलेला अधिक उपचारासाठी दोडामार्ग रुग्णालयात पाठविण्यात आले.
शनिवारी साटेली-भेडशीचा आठवडा बाजार असल्याने परिसरातील अनेक लोक बाजारात खरेदीसाठी येतात. त्यामुळे परिसरातील सर्व रस्त्यांवर मोठी वर्दळ असते. शनिवारी सकाळी १०च्या सुमारास भेडशी खालचा बाजार येथील कॉजवेलगत असलेल्या झाडावरील मधमाशा अचानकपणे उठल्या. वाऱ्याने फांदी हलून त्या दुखावल्या गेल्याने त्या खूपच आक्रमक झाल्या. त्यावेळी त्या मधमाशांनी येथून जाणाऱ्या येणाऱ्या दुचाकीस्वारांवर आणि पायी चालणाऱ्यांवर हल्ला केला. यावेळी काही ग्रामस्थांनी भीतीने नदीतही उडी घेतली. मात्र, मधमाशांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. त्यानंतर त्यांनी बाजाराच्या दिशेने धाव घेतली. त्यापाठोपाठ मधमाशाही बाजाराच्या दिशेने धावू लागल्या. यावेळी घाबरून रस्त्याशेजारील घरमालकांनी घरांचे दरवाजे बंद करून घेतले. मात्र, मधमाशांनी पंधराजणांचा चावा घेतला. त्यानंतर भेडशी येथील व्यापारी अनिल मोरजकर आणि गणेश स्वार यांनी रस्त्यावरच पुठ्ठ्यांना आग लावून धूर केल्याने मधमाशा पळून गेल्या, अन्यथा आणखी काहीजणांचा चावा घेतला असता. त्यानंतर जखमींना तातडीने साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य कें द्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. बी. वारंग आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार केले. त्यातील एका रुग्णाला जास्त अस्वस्थ वाटल्याने दोडामार्ग रुग्णालयात पाठविण्यात आले.
जखमींची संख्या जास्त असल्याने दवाखान्यातील कॉटही कमी पडले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कसरत करून जखमींवर उपचार केले.
या मधमाशांच्या हल्ल्यात हरिदास तुकाराम राठोड (साटेली-भोमवाडी), लक्ष्मण काशीराम महालकर, दीक्षा लक्ष्मण महालकर, सुरेश लक्ष्मण गवस (सर्व रा. पिकुळे), मुकुंद रामा गवस (खोक्रल), नारायण सुखदेव डवरी (सावंतवाडी), वैजयंती वासुदेव गवस (खोक्रल), संगीता लालचंद्र राठोड (कामुळवाडी), उर्मिला अंकुश गवस (हेवाळे), महानंद बुधाजी नाईक, उल्हास कृष्णा नाईक (पिकुळे), सत्यवती मुकुंद गवस (खोक्रल), सखाराम गंगाराम झोरे (कामुळवाडी), गंगाराम पांडुरंग मुंज (भेडशी) हे सर्वजण जखमी झाले.
या सर्व जखमींना साटेली-भेडशी आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर प्रमिला राजाराम गवस (भोमवाडी) यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून नंतर अधिक उपचारांसाठी दोडामार्ग येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आहे. (वार्ताहर)