लॉटरीचे आमिष दाखवून दीड लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 05:10 PM2017-07-22T17:10:44+5:302017-07-22T17:10:44+5:30
अमित सिंघानिया विरोधात संगमेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा
आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी, दि. २२ : लॉटरी लागली असल्याचे सांगून ५० वर्षीय महिलेला दीड लाखाला चुना लावल्याची घटना नायरी येथे घडली आहे. याप्रकरणी अमित सिंघानिया नामक व्यक्तीच्या विरोधात संगमेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
गेल्या काही महिन्यांपासून नोकरी लावतो, एटीएम बंद पडले आहे, लॉटरी लागली आहे, असे सांगून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली असल्याचे वारवांर पुढे आले आहे. अशीच एक घटना नायरी घडली असून, लॉटरीचे आमिष दाखवून महिलेला दीड लाखाचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे.
शाहीन फजलुद्दीन पाटणकर (५०, नायरी मुस्लीम मोहल्ला, संगमेश्वर) यांना १२ जुलै रोजी मोबाईलवर फोन आला. मी अमित सिंघानिया बोलत आहे. तुम्हाला सहा लाखांची लॉटरी लागली आहे, असे सांगितले. अमित याने शाहीन यांच्या अज्ञानाचा फायदा घेतला.
लागलेल्या सहा लाख रुपयांचा लॉटरीचा चेक वटविण्यासाठी त्यांनी शाहीनकडे वेळोवेळी आपल्या बँकेच्या खात्यात रक्कम भरण्यास सांगितली. त्यानुसार शाहीन यांनी वेळोवेळी रक्कम भरली. ही रक्कम १ लाख ३५ हजार इतकी झाली, तरी लॉटरीचा चेक त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. लाखो रूपयांचा भरणा करूनही लॉटरीचे पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे शाहीन पाटणकर याच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ संगमेश्वर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.