वाशिष्ठी नदीतून पंधरा दिवसांत १५ हजार घनमीटर गाळ उपसा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 06:15 PM2023-03-02T18:15:09+5:302023-03-02T18:15:29+5:30

शासनाने दिलेल्या १० कोटी निधीपैकी ६ कोटी खर्च झाला

15 thousand cubic meters of silt will be pumped from Vashishthi river in fifteen days | वाशिष्ठी नदीतून पंधरा दिवसांत १५ हजार घनमीटर गाळ उपसा

वाशिष्ठी नदीतून पंधरा दिवसांत १५ हजार घनमीटर गाळ उपसा

googlenewsNext

चिपळूण : येथील वाशिष्ठी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी नाम फाउंडेशनच्या पुढाकारातून गेल्या १५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा केला जात आहे. एकाच वेळी चार ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू असून, अडथळे येऊनही पंधरा दिवसांत १५ हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात यश आले आहे. अजूनही पहिल्या टप्प्यातील गाळ उपशाचा मोठा पल्ला बाकी आहे. त्यादृष्टीने नाम फाउंडेशनने तयारी ठेवली आहे.

जलसंपदा विभागाने वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा कामासाठी तीन टप्पे तयार केले आहेत. गतवर्षीच्या पावसामुळे वाशिष्ठी नदीतील पहिल्या टप्प्यातील गाळ उपशाचे काम काही ठिकाणी थांबले होते. पावसाळ्यानंतर पहिल्या टप्प्यातील उर्वरित तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात ८.१० दशलक्ष घनमीटर गाळ काढून झाला आहे. त्यासाठी शासनाने दिलेल्या १० कोटी निधीपैकी ६ कोटी खर्च झाला आहे, तर ४ कोटी रूपये शिल्लक आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील काम संथ गतीने होत असल्याने चिपळूण बचाव समितीने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी गंभीर दखल घेत यंत्रणा हलवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत गाळ उपसा कामासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पहिल्या टप्प्यातील शिल्लक राहिलेला संपूर्ण गाळ नाम फाउंडेशन काढेल, अशी ग्वाही मल्हार पाटेकर यांनी दिली. त्यानुसार नाम फाउंडेशनचे ८ पोकलेन व १५ टिप्पर, एक ४५ मीटरचा लॉंग रिच बूम दाखल झाला. या यंत्रणेच्या साहाय्याने १५ दिवस सातत्याने गाळ उपशाचे काम सुरू आहे.

शहरातील पेठमाप भाटण, बाजारपूल गणेश विसर्जन घाट, उक्ताड व गोवळकोट धक्का, अशा चार ठिकाणी एकाच वेळी गाळ उपशाचे काम केले जात आहे. यामध्ये गोवळकोट धक्का येथे लॉंग रिच बूमच्या साहाय्याने गाळ उपसा केला जातो. हे काम पूर्णतः पाण्यात असल्याने नाम फाउंडेशनची यंत्रणा मोठ्या शिताफीने काम करीत आहे. साधारण ८०० मीटर लांबीचे येथे बेट असून, त्यातील बहुतांशी गाळ उपसा करण्यात आला. याशिवाय उक्ताड जुवाड बेट येथे २ पोकलेन, पेठमाप २ व बाजारपूल येथे १ पोकलेन आणि जेसीबीने काम सुरू आहे.

Web Title: 15 thousand cubic meters of silt will be pumped from Vashishthi river in fifteen days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.