महिला रूग्णालयाच्या दुसऱ्या भागात लवकरच १५० खाटांची सुविधा : लक्ष्मीनारायण मिश्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:31 AM2021-04-17T04:31:31+5:302021-04-17T04:31:31+5:30
रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शुक्रवारी दुपारी शहरानजीकच्या उद्यमनगर भागातील जिल्हा महिला रुग्णालयात जावून तिथल्या परिस्थितीची पाहणी केली. ...
रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शुक्रवारी दुपारी शहरानजीकच्या उद्यमनगर भागातील जिल्हा महिला रुग्णालयात जावून तिथल्या परिस्थितीची पाहणी केली. यावेळी या इमारतीच्या दुसऱ्या अपूर्ण राहिलेल्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत हे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सक्त आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. येत्या आठवडाभरात या इमारतीत कोरोना रूग्णांसाठी १५० खाटा वाढविण्यात येणार असल्याची माहिती मिश्रा यांनी यावेळी दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी डाॅ. विकास सूर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले, उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे, आदी अधिकारी उपस्थित होते
गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग वाढू लागताच ऑगस्ट महिन्यात जिल्हा महिला रूग्णालयाच्या इमारतीच्या पहिल्या फेजमध्ये घाईगडबडीत कोरोना विभाग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या फेजचे काम वर्षभरात पूर्ण होणे जरुरीचे होते, परंतु बांधकाम खाते गाफील राहिले. मात्र, यावर्षी पुन्हा कोरोनाचा कहर झाला आहे. दिवसाला ५००पेक्षा अधिक रूग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे शासकीय रूग्णालंयामधील खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. रूग्णांचे हाल होऊ लागले असून, त्यांना उपचार मिळताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शुक्रवारी या रूग्णालयाला भेट देत पाहणी केली.
करोडो रुपये खर्च करूनही महिला रूग्णालयाची इमारत अपुरी आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शुक्रवारी जातीनिशी महिला रुग्णालयाची तसेच अपूर्ण असलेल्या दुसऱ्या फेजची पाहणी केली आणि हे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले. महिला रूग्णालयात सध्या २० खाटांचा असलेला सेमी आयसीयू कक्षही आयसीयू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या भेटीमुळे आता लवकरच या इमारतीच्या दुसऱ्या भागात सुमारे १५० खाटांची सोय होणार आहे.
चौकट
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पुरेल एवढा रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे. बफर स्टाॅकमध्ये सध्या १०० इंजेक्शन्सचा साठा आहे. त्याशिवाय जिल्ह्यात १०० इंजेक्शन उपलब्ध आहेत. ऑक्सिजनचा साठा आणि ऑक्सिजन बेडची संख्याही पुरेशी आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी रायगड आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणाहून १८ टन आणि ३२ टन ऑक्सिजन मिळाला आहे. त्यासाठी नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. खासगी ऑक्सिजन जप्त केला असून, त्याचा वापरही कोरोना रुग्णांसाठी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रत्नागिरी शहरात आणखी १६० नवीन बेड तयार करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या जिल्ह्यात ४५० ऑक्सिजन बेड आहेत, ते वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोविड केअर सेंटरची क्षमताही तीन हजार करण्याचे नियोजन करत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱी मिश्रा यांनी दिली.