शिक्षणसेवकांचे मानधन १५ हजार करणार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 01:18 PM2022-09-07T13:18:44+5:302022-09-07T13:19:22+5:30
शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करण्याची दिली ग्वाही
रत्नागिरी : प्राथमिक शिक्षकांची ३१ हजार रिक्त पदे तातडीने भरावीत व अन्य मागण्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन केल्या. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचे निवेदनही शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्र्यांना दिले. इतर विषयांबाबत सकारात्मक चर्चा करतानाच मंत्री केसरकर यांनी शिक्षणसेवकांचे मानधन १५ हजार रुपये करण्याचे आश्वासन दिले आहे.
मंत्री केसरकर यांची शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव, कोषाध्यक्ष संभाजी बापट, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक नागवेकर, माधवराव पाटील, वसंतराव हारुगडे, राजाराम वरुटे, हनुमंत शिंदे व अन्य शिक्षक नेत्यांनी भेट घेऊन चर्चा केली.
शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करणार, राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांपैकी ५० टक्के पदे तातडीने भरणार, वर्गात फोटो लावण्याचे परिपत्रक रद्द करणार, प्राथमिक शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करणार, याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांची जास्तीत जास्त पदे शिक्षकांतून भरणे, कोविड काळात मृत शिक्षकांची विमा कवच रक्कम वर्ग करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना करणे, यावर चर्चा करून ते लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले.
मानधन वाढवणार
शिक्षक नेते माधवराव पाटील यांनी शिक्षण सेवकांचे मानधन वाढीबाबत आग्रही मागणी केली. त्यावेळी मंत्री केसरकर यांनी शिक्षण सेवकांचे मानधन १५ हजार रुपये करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच शिक्षक संघाच्या लवकरच होणार शिक्षण परिषदेला मुख्यमंत्र्यांना घेऊन येणार असल्याची ग्वाही शिक्षणमंत्री केसरकर यांनी शिक्षक पदाधिकाऱ्यांना दिली.