जवाहर चौकातील काेराेना चाचणीत १६ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:08+5:302021-05-30T04:25:08+5:30
राजापूर : दोन दिवसांपूर्वी राजापूर शहरातील जवाहर चौकातील पिकअप शेडमध्ये घेण्यात आलेल्या १५५ आरटीपीसीआरच्या चाचणीमधील १३९ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह ...
राजापूर : दोन दिवसांपूर्वी राजापूर शहरातील जवाहर चौकातील पिकअप शेडमध्ये घेण्यात आलेल्या १५५ आरटीपीसीआरच्या चाचणीमधील १३९ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर १६ जण पॉझिटिव्ह सापडल्याने राजापूर शहरात खळबळ उडाली आहे.
राजापूर शहरात विनाकारण फिरणाऱ्यांच्या विरोधात महसूल, पोलीस ठाणे, नगर परिषद आणि राजापूर ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने धडक मोहीम राबविण्यात आली होती. त्यानुसार शहरात विनाकारण फिरणाऱ्या १५५ जणांची आरटीपीसीआर तर आठजणांची ॲन्टिजन चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी ॲन्टिजनचे सर्व अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र, आरटीपीसीआर घेतलेल्या नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले नव्हते. त्या सर्वांचे अहवाल शनिवारी येथील तालुका आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये १३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, १६ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. हे रुग्ण राजापूर शहराच्या आजुबाजूच्या खेडेगावातील आहेत. त्याचबराेबर रत्नागिरीमधून राजापुरात आलेल्या काही नागरिकांचाही त्यामध्ये सामावेश आहे. दैनंदिन खरेदीसाठी राजापूर शहरात आजुबाजूच्या खेडेगावातील ग्रामस्थ येतात. दरम्यान, प्रशासनाने अचानक शहरात काेराेना चाचणी घेतली. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी शहरात ठिकठिकाणी काेराेना चाचणी करण्याची मागणी हाेत आहे. या चाचणीमुळे नागरिकांना वचक बसून काेराेनाबाधित रुग्ण शाेधणेही साेपे हाेईल, असे मत नागरिकांमधून व्यक्त हाेत आहे.