वेत्ये-तिवरे किनारपट्टीवर सापडली तब्बल १६४ ऑलीव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची अंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 01:52 PM2022-02-09T13:52:15+5:302022-02-09T13:56:12+5:30
गेल्या काही वर्षामध्ये तालुक्याच्या वेत्ये-तिवरे किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची अंडी आढळून येत आहेत
राजापूर : तालुक्याच्या पश्चिम सागरी किनारपट्टीवरील वेत्ये-तिवरे येथे ऑलीव्ह रिडले प्रजातीच्या कासवाच्या अंड्यांची एकाच दिवशी दोन घरटी सापडली आहेत. त्यामध्ये त्यामध्ये एका घरट्यामध्ये ७० तर, एका घरट्यामध्ये ९४ अंड्यांचा अशी तब्बल १६४ अंड्यांचा समावेश आहे.
वेत्ये-तिवरे समुद्र किनारपट्टीवर आजपर्यंत कासवाच्या अंड्याची सहा घरटी झाली असून त्यातून, आजपर्यंत ५५८ अंड्यांचे सुरक्षितपणे संवर्धन करण्यात आले आहे. कासवमित्र गोकुळ जाधव यांना ही अंडी आढळली असून त्यांनी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याचे योग्यपद्धतीने संवर्धन केले आहे.
गेल्या काही वर्षामध्ये तालुक्याच्या वेत्ये-तिवरे किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची अंडी आढळून आली आहेत. त्यांचे वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली कासवमित्र जाधव यांच्याकडून योग्य पद्धतीने संवर्धन केले जात आहे. त्याप्रमाणे यावर्षीही यापूर्वी कासवाच्या अंड्यांची चार घरटी सापडली आहेत. त्यामध्ये जाधव यांनी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली ३९४ अंड्यांचे सुरक्षितपणे संवर्धन केले आहे.
आज पुन्हा याच ठिकाणी जाधव यांना वाळूमध्ये उमटलेले कासवाच्या पावलांचे ठसे दिसले. त्या ठशांच्या अनुषंगाने त्यांनी पाहणी केली असता त्यांना अंड्याची दोन घरटी दिसली. त्यामध्ये १६४ अंड्यांचा समावेश आहे. राजापूर वनविभागाचे वनपाल सदानंद घाटगे, सागर गोसावी आदींशी संपर्क साधून त्याबाबतची त्यांनी माहिती दिली. त्यानंतर किनार्यावरील वन्य प्राणी वा जंगली श्वापदापासून त्या अंड्याचे संरक्षण करण्याच्यादृष्टीने वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली अंड्यांचे सुरक्षित ठिकाणी संवर्धन करून ठेवण्यात आले आहे.