१७ दिवस, तब्बल ६,२१२ किलोमीटर प्रवास; रत्नागिरीतील हातखंबा येथील तरुणांनी दुचाकीवरून पुर्ण केली चारधाम यात्रा
By शोभना कांबळे | Published: June 24, 2023 01:13 PM2023-06-24T13:13:15+5:302023-06-24T13:43:32+5:30
प्रवासादरम्यान बदलत्या वातावरणाचे तसेच अवघड चारधाम यात्रेचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते
रत्नागिरी : हातखंबा येथील चार तरुणांनी उत्तराखंड येथील अतिशय अवघड समजली जाणारी यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथ अशी चारधामची यात्रा दुचाकीवरून पूर्ण केली. १७ दिवसांत त्यांनी दोन दुचाकीवरून तब्बल ६,२१२ किलोमीटरचा टप्पा पार केला. यात लांजा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील आरोग्य सेवक आझाद विचारे यांच्यासोबत प्रतीक विचारे, अमर विचारे आणि विनायक विचारे यांचा सहभाग होता.
१ जून रोजी सकाळी या चाैघांचा प्रवास हातखंबा येथून दोन दुचाकीवरून सुरू झाला. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ज्याेतिर्लिंगाचे दर्शन घेत ते मध्यप्रदेशात पोहोचले. तेथे त्यांनी ओंकारेश्वर व उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. आग्रा येथील ताजमहाल पाहून ते हरिद्वारला गेले. तिथे सोमप्रयाग, गाैरीकुंड तिथून केदारनाथपर्यंतचे २२ किलोमीटरचे अंतर पायी पाच तासात पार केले. तिथे गर्दी असल्याने सकाळी नऊ वाजता रांगेत उभे राहिल्यानंतर तब्बल दहा तासानंतर सायंकाळी सात वाजता त्यांना केदारनाथ दर्शन झाले.
तिथून पुन्हा सोमप्रयाग येथे येऊन त्यांनी पुढील धाम बद्रीनाथचा प्रवास सुरू केला. वाटेत आशिया खंडातील सर्वात उंचावर असलेल्या शिवलिंग तुंगनाथचे तीन किलोमीटर पायी ट्रेक करत त्यांनी दर्शन घेतले. बनियाकुंडे येथे त्यांनी दाेन अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानात वास्तव्य केले. तिथून बद्रीनाथ आणि गंगोत्री या पुढील धामांकडे प्रवास करताना पायी ट्रेक करत अनेक स्थळांचे दर्शन घेतले.
या प्रवासादरम्यान बिपरजाॅय चक्रीवादळ अरबी समुद्रातून पुढे सरकत असल्याचे त्यांना बातम्यांमधून कळत होते. आझाद विचारे यांनी या वादळाचे लोकेशन आणि त्याचा मार्ग मोबाइलवर शोधून दिल्ली- गुजरात- मुंबई हा परतीचा मार्ग स्वीकारल्यास वादळ भेटणार, हे गृहीत धरून मार्गच बदलला आणि वाराणसीमार्गे पुन्हा प्रवास सुरू झाला. तिथून नागपूर- नांदेड- लातूर- सोलापूरमार्गे १७ जून रोजी ते हातखंबा येथे पोहोचले.
या दुचाकीवरून होणाऱ्या प्रवासादरम्यान बदलत्या वातावरणाचे तसेच अवघड चारधाम यात्रेचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते. मात्र, त्यांनी ते आव्हान झेलत ही ६,२१२ किलोमीटरची यात्रा दुचाकीवरून यशस्वी केली. यापूर्वीही आझाद विचारे यांनी लेह- लडाख, कन्याकुमारी, गुजरात आदी ठिकाणी बाइक ट्रीप केली आहे. भविष्यात गुजरातमधील गिरनार, सोमनाथ आणि ओडिसामधील जगन्नाथ पुरीपर्यंत बाइक ट्रीप करण्याचा त्यांचा मानस आहे.