Ratnagiri: देवळेचा सुपुत्र १७ वर्षीय प्रशिक इंग्लंडमध्ये खेळणार

By शोभना कांबळे | Published: June 21, 2024 03:26 PM2024-06-21T15:26:27+5:302024-06-21T15:26:53+5:30

मुंबई क्रिकेट क्लबमधून २० दिवसांच्या टूरसाठी आज रवाना होणार

17-year-old Prashik Salvi from Devale in Sangameshwar taluka selected as a bowler for England tour from Mumbai Cricket Club | Ratnagiri: देवळेचा सुपुत्र १७ वर्षीय प्रशिक इंग्लंडमध्ये खेळणार

Ratnagiri: देवळेचा सुपुत्र १७ वर्षीय प्रशिक इंग्लंडमध्ये खेळणार

शोभना कांबळे

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील देवळे बाैद्धवाडीतील रहिवासी रामचंद्र साळवी यांचा १७ वर्षीय नातू प्रशिक याची मुंबई क्रिकेट क्लबमधून इंग्लंडच्या दाैऱ्यासाठी गाेलंदाज म्हणून निवड झाली असून, तो इंग्लंडमध्ये खेळणार आहे. शुक्रवारी (२१ जून) तो पुणे येथून इंग्लंडला रवाना होत आहे.

प्रशिक्ष याचे वडील नितीन रामचंद्र साळवी हे पुणे येथे पोलिस खात्यात कार्यरत आहेत. त्यामुळे प्रशिक याचे प्रारंभीपासूनचे शिक्षण पुणे येथे झाले. आता तो सिंहगड काॅलेज, येवलेवाडी (कोंढवा) येथे बारावीत आहे. वयाच्या ५ व्या वर्षापासूनच त्याला क्रिकेटची आवड होती. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीनुसार तो पोलिस लायन बाॅय क्लबमध्ये क्रिकेटचे धडे घेऊ लागला. अल्पवधीतच त्याने गोलंदाजीचे तंत्रशुद्ध शिक्षण या क्लबच्याच पुनीत बालन ग्रुपमधून आत्मसात केले. शिक्षण घेतानाच त्याने आपली क्रिकेट खेळाची आवड सांभाळली. अवघ्या १७ व्या वर्षात त्याने निष्णात बाॅलर म्हणून ओळख निर्माण केली.

लहान वयातील त्याच्या या क्रिकेटमधील काैशल्यामुळे पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून तो मुंबई क्रिकेट क्लबमधून इंग्लंड येथे २२ जून ते १२ जुलै २०२४ या कालावधीत आयोजित दाैऱ्यात गोलंदाज म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. तो पुण्यातून शुक्रवारी सायंकाळी या दाैऱ्यासाठी रवाना होणार आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याच्या देवळे गावातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तो शिकत असलेल्या पुण्यातील सिंहगड काॅलेजनेही त्याचा सत्कार केला आहे.

प्रशिकचे वडील नितीन साळवी यांच्याबरोबरच त्याचे काका वैभव हेही पोलिस दलात आहेत. त्याचप्रमाणे त्याची आत्या संपदा साळवी -सावंत याही पोलिस दलात कार्यरत आहेत. तसेच रत्नागिरीत सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेले प्रफुल्ल साळवी हेही त्याचे काका आहेत. देवळे बाैद्धवाडीतील दिवंगत बाबूराव वासुदेव साळवी तसेच रामचंद्र आणि अनंत वासुदेव साळवी यांचा तो नातू आहे.

प्रशिक याला घरच्यांचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने लहान वयातच त्याने हे यश मिळविले आहे. तसेच पुनीत बालन ग्रुप, त्याच्या वडिलांचे सहकारी आणि अधिकारी यांच्यामुळे प्रशिक याला इंग्लंडमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल त्याच्यावर काैतुकाचा वर्षाव होत आहे.

Web Title: 17-year-old Prashik Salvi from Devale in Sangameshwar taluka selected as a bowler for England tour from Mumbai Cricket Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.