कोटा येथून १८ विद्यार्थी रत्नागिरीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 02:01 PM2020-05-02T14:01:22+5:302020-05-02T14:13:04+5:30
या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून आणण्यासाठी परिवहन मंत्री अॅॅड. अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही प्रयत्न केले. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मध्यप्रदेश तसेच गुजरात राज्यांतून महाराष्ट्रात आणण्यात आले.
रत्नागिरी : राजस्थानामधील कोटा येथे शिक्षणासाठी गेलेल्या रत्नागिरीतील १८ विद्यार्थ्यांना शनिवारी सकाळी ६ वाजता रत्नागिरीत एस्. टी. बसने आणण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील १८ व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ असे एकूण २२ विद्यार्थ्यांना रत्नागिरीत आणण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी गेलेले महाराष्ट्रातील १८०० विद्यार्थी कोटा येथे लॉकडाऊनमुळे अडकले होते. या सर्व विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा केली होती. या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून आणण्यासाठी परिवहन मंत्री अॅॅड. अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही प्रयत्न केले. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मध्यप्रदेश तसेच गुजरात राज्यांतून महाराष्ट्रात आणण्यात आले.
परिवहन महामंडळाच्या धुळे आगाराच्या सुमारे ७६ बसेस कोटा येथे विद्यार्थ्यांना आणण्यासाठी गेल्या होत्या. तेथून विद्यार्थ्यांना घेऊन दि. ३० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता परतीच्या प्रवासासाठी रवाना झाल्या. शनिवारी सकाळी ही बस रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाली. यामध्ये मंडणगड ९, खेड ९, दापोली २, रत्नागिरी ६ आणि सिंधुदुर्ग ३ असे एकूण २२ विद्यार्थी होते. खेड, मंडणगड, दापोलीतील विद्यार्थ्यांची कळंबणी रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली, तर रत्नागिरीतील सहा विद्यार्थ्यांची शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आली.