लांजा तालुक्यात १९ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:34 AM2021-05-20T04:34:28+5:302021-05-20T04:34:28+5:30
लांजा : तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार फटका लांजा तालुक्याला बसला आहे. तालुक्यात २०९ घरांचे अंशतः, ३ घरांचे पूर्णतः तसेच १६ ...
लांजा
: तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार फटका लांजा तालुक्याला बसला आहे. तालुक्यात २०९ घरांचे अंशतः, ३ घरांचे पूर्णतः तसेच १६ गोठे, ३ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने आतापर्यंत केलेल्या पंचनाम्यात १९ लाख ६४ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, अजूनही पडझड झालेल्या घराचे पंचनामे करण्याचे काम चालू आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा शनिवारी दुपारपासून लांजा तालुक्यात जाणवायला लागला. शनिवारी दुपारी जोरदार हवा व पावसाची रिपरिप सुरू झाली होती. सायंकाळी ४.३० च्यादरम्यान जोरदार पाऊस सुरू झाला. सोसाट्याच्या वाऱ्याने तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने कुठेही मनुष्यहानी झाली नाही. तालुक्यात ३ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. यामध्ये २ घरांचे पंचनामे करण्यात आले असून, या २ घरांचे ३ लाख ४५ हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच अंशतः नुकसान झालेली २०९ घरामध्ये १२७ घरांचे पंचनामे करण्यात आले असून, १५ लाख २४ हजारांचे नुकसान झाले आहे. आणखी ८२ पंचनामे करायचे शिल्लक आहेत.
तालुक्यात १६ गोठ्यांचे नुकसान झाले असून, ११ गोठ्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यात १७ हजारांचे नुकसान झाले आहे. ५ गोठ्यांचे पंचनामे करायचे शिल्लक आहेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या पंचनाम्यात एकूण १९ लाख ६४ हजारांचे नुकसान झाले आहे. गेली पाच दिवस तालुक्यातील ग्रामीण भागात अद्यापही विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात विद्युत महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना यश आले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजना ठप्प झाल्याने पाणी असूनही पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.