लांजा येथे कपाटातील २ लाखांचा ऐवज चाेरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:36 AM2021-08-12T04:36:04+5:302021-08-12T04:36:04+5:30
लांजा : घरातील लोखंडी कपाटाची चावी घेऊन कपाटातील १ लाख ९६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व १० ...
लांजा : घरातील लोखंडी कपाटाची चावी घेऊन कपाटातील १ लाख ९६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व १० हजार रुपये रोख, असा एकूण २ लाख ६ हजार रुपयांचा ऐवज चोरली गेल्याची घटना लांजा शहरातील असीम रेसिडेन्सी येथे घडली. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा फिर्याद दाखल करण्यात आली.
माध्यमिक शिक्षक म्हणून काम करणारे रामचंद्र हिरू भातडे (३५) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. असीम रेसिडेन्सी येथे दुसऱ्या मजल्यावर पत्नी व छाेट्या मुलीसह राहतात. तसेच मुलीला सांभाळण्यासाठी एक महिलाही आहे. दि २७ जुलै ते दि ६ ऑगस्ट या कालावधीत फ्लॅटच्या बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटाच्या लाॅकरमध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम ठेवण्यात आली होती. याच कपाटातील दुसऱ्या बाजूला कपाटातील लाॅकरच्या चाव्या ठेवण्यात आल्या होत्या. या चाव्यांचा वापर करून अज्ञाताने लाॅकरमध्ये ठेवलेला दीड तोळ्याचा सुमारे ६० हजार रुपये किमतीचा हार, दोन तोळ्याचे सुमारे ८० हजार रुपये किमतीचे ब्रेसलेट, ५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या सुमारे २० हजार रुपये किमतीच्या, ३ ग्रॅम वजनाच्या ३ सोन्याच्या अंगठ्या सुमारे १२ हजार रुपये किमतीच्या, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन २० हजार किमतीची, ५ ग्रॅमचे कानातील दोन जोड सुमारे २० हजार रुपये किमतीचे, १ ग्रॅम सोन्याची मूर्ती सुमारे ४ हजार रुपये किमतीची तसेच ५०० रुपयांच्या २० नोटा एकूण १० हजार रुपये रोख असा ऐवज चाेरला.
दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे रामचंद्र भातडे यांच्या दि. ६ ऑगस्ट रोजी लक्षात आले. त्यानुसार भातडे यांनी सोमवारी सायंकाळी चोरी झाल्याची फिर्याद दिली. त्यानुसार पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हेडकाॅन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करीत आहेत. मंगळवारी श्वान पथकाद्वारे या चाेरीचा छडा लावण्यात आला. मात्र, काेणताचा पुरावा पाेलिसांना आढळला नाही.