कोकणासाठी २ हजार घरांची लॉटरी, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 04:53 PM2018-09-22T16:53:35+5:302018-09-22T16:56:08+5:30
कोकणातील जनतेसाठी म्हाडाकडून २ हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, आॅनलाईन अर्ज भरुन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी केले.
रत्नागिरी : कोकणातील जनतेसाठी म्हाडाकडून २ हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, आॅनलाईन अर्ज भरुन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी केले.
कोणतेही राजकारण न आणता, गावच्या विकासासाठी प्रामाणिकपणे सर्वांना बरोबर घेत काम करणे गरजेचे आहे. म्हाडाचे अध्यक्षपदाचा जिल्ह्याच्या विकासात फायदा होणार आहे. गावागावात विकास करण्यासाठी गावातील सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केले.
रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये मुख्य रस्ता ते टेंभ्ये शिवाजीवाडी नदीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. टेंभ्ये मुख्य रस्ता ते टेंभ्ये शिवाजीवाडी नदीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन सामंत यांच्याहस्ते झाले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवयानी झापडेकर, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय मयेकर, बंड्या साळवी, शिल्पा सुर्वे, टेंभ्येच्या सरपंच कांचन नागवेकर, उपसरपंच सायली साळवी तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
टेंभ्ये मुख्य रस्ता ते टेंभ्ये शिवाजीवाडी नदीकडे जाणारा रस्ता शिमगोत्सवापर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास यावेळी सामंत यांनी व्यक्त केला. हातीस-तोणदे पुलासाठी निधी मंजूर झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी वरचे टेंभ्ये येथे आर.सी.सी. तळी बांधणे तसेच टेंभ्ये - बौध्दवाडी येथे स्मशानशेड बांधणे या कामांचे भूमिपूजनही आमदार सामंत यांच्याहस्ते करण्यात आले.