चिपळूण आगारातून २० बसफेऱ्या; ॲन्टिजेन तपासणीत १ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:31 AM2021-04-17T04:31:27+5:302021-04-17T04:31:27+5:30
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतुकीत एस.टी. वाहतूक सुरू आहे. मात्र ...
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतुकीत एस.टी. वाहतूक सुरू आहे. मात्र दिवसभरात एस.टी.च्या केवळ २० फेऱ्या होत असून प्रवासी संख्याही नगण्य आहे. या आगारात शुक्रवारी काही प्रवाशांची अँटिजेन तपासणी केली असता, त्यामध्ये एक प्रवासी पॉझिटिव्ह आढळला आहे.
कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन सुरू केला आहे. रुग्णालये, मेडिकल्स, भाजीपाला, किराणा दुकान, खाद्यपदार्थ आदी दुकाने सुरू आहेत. शहर परिसरात रिक्षा व्यवसायही सुरू आहे. मात्र बहुतांशी लोक घरातून बाहेर पडत नसल्याने रिक्षा व्यावसायिकांनाही प्रवासी मिळत नसल्याची स्थिती आहे.
यावेळच्या लॉकडाऊनमध्ये एस.टी. वाहतूक बंद ठेवण्यात आलेली नाही. ती नियमित सुरू आहे. मात्र तेथेही प्रवासी मिळत नसल्याची स्थिती आहे. येथील चिपळूण आगारातून रत्नागिरी, खेड, शेल्डी, पोफळी, नोसील, गाणे, डेरवण रुग्णालय आदी ठिकाणी बसेस सोडण्यात आल्या आहेत. आवारातील प्रवाशांची कोरोना चाचणी केली असता, यातील एक कोरोनाबाधित आढळला आहे. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
परवानगीसाठी येणाऱ्यांचीही तपासणी
लग्नकार्याला परवानगी मिळण्यासाठी शुक्रवारी येथील प्रांत कार्यालयात लोकांनी मोठी गर्दी केली होती. ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करूनही लोक थेट कार्यालयात धाव घेत होते. एकटा येण्याऐवजी चारचाकीतून पाच ते सहाजण येत होते. यामुळे प्रांत कार्यालय परिसरात गर्दी झाली. त्यामुळे मोबाईल व्हॅन बोलावून त्यांची कोरोना चाचणी सुरू करण्यात आली. ३० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र त्यात कोणीही बाधित आढळले नाही.
....................
चिपळूण प्रांताधिकारी कार्यालयात आलेल्यांची अँटिजेन तपासणी करण्यात आली.