चिपळूणमध्ये २० आरोग्य पथके कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:28 AM2021-07-26T04:28:38+5:302021-07-26T04:28:38+5:30
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यात महापुराचे पाणी ओसरले असले तरी तेथे आता नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार ...
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यात महापुराचे पाणी ओसरले असले तरी तेथे आता नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने सतर्क राहून २० आरोग्य पथके चिपळूण शहरासह आजूबाजूच्या परिसरात कार्यरत ठेवली आहेत.
चिपळूण, खेड शहरांमध्ये गेल्या दोन महापुराने हाहाकार उडाला होता. संपूर्ण चिपळूण शहर व आजूबाजूच्या परिसराला महापुराच्या पाण्याने वेढले होते. महापुराच्या पाण्याने अन्नधान्य भिजून खराब झाले आहे. त्यासाठी जिल्हाभरातून लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. तरीही अनेकांपर्यंत मदतच पोहोचलेली नाही.
अचानक आलेल्या महापुराचे पाणी ओसरले आहे; मात्र चिपळूण परिसरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहेत. तसेच सगळीकडे कचरा पसरला आहे. पाणी ओसरल्याने आता लोक घरातील चिखल साफ करीत आहेत.
कचरा, चिखलामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग चिपळूणकरांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. चिपळूणमध्ये २० आरोग्य पथके तत्काळ कामाला लागली आहेत. त्यातील १५ आरोग्य पथके शहरी भागात तर ५ आरोग्य पथके ग्रामीण भागात कार्यरत ठेवण्यात आली आहेत. या आरोग्य पथकांमध्ये डाॅक्टर, आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविकेचा समावेश करण्यात आला आहे. या आरोग्य पथकांच्या साथीला आशासेविकांनाही देण्यात आले आहे. तसेच पुरेसा औषध साठा ठेवण्यात आला आहे.
-----------------------------
जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून तत्काळ मदतकार्य करण्यात आले आहे. चिपळूणमध्ये औषधसाठ्यासह आरोग्य पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, रोगराई पसरणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.
- डॉ. अनिरुद्ध आठल्ये,
जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद, रत्नागिरी.