पंढरपूर यात्रेसाठी लांजा आगारातून २० गाड्या
By admin | Published: October 31, 2014 11:35 PM2014-10-31T23:35:30+5:302014-10-31T23:35:57+5:30
लांजा : पंढरपूर यात्रेसाठी लांजा आगारातून २६ गाड्या आरक्षित झाल्या
लांजा : पंढरपूर यात्रेसाठी लांजा आगारातून २६ गाड्या आरक्षित झाल्या असून, त्यापैकी २० गाड्या पंढरपूर यात्रेसाठी रवाना झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक आलम देसाई यांनी दिली आहे. दरम्यान, याचा फटका येथील स्थानिक फेऱ्यांना बसल्याने अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीची पंढरपूरची यात्रा असून, कोकणातून वारकरी, भक्त मोठ्या प्रमाणात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. या वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून लांजा आगाराकडून जादा गाड्या सोडण्यात येतात.
एक महिनाभर अगोदरच प्रत्येक गावागावातून एस. टी.च्या गाड्या बुक केल्या जातात. प्रत्येक गावाला कशी गाडी देता येईल, यासाठी आगाराकडून प्रयत्न केला जातो. त्याप्रमाणे २६ गाड्यांचे बुकिंग झाले. त्यातील २० गाड्या पंढरपूर यात्रेला रवाना झाल्या आहेत. दरवर्षी लांजा एस. टी. आगाराला पंढरपूर यात्रेतून चांगला नफा होत आला आहे. यावर्षीही लांजा आगाराला चांगला नफा होईल, असेही आगार व्यवस्थापक देसाई यांनी सांगितले आहे.
पंढरपूर यात्रेसाठी लांजा आगारातून गाड्या सोडण्यात आल्याने येथील स्थानिक फेऱ्यांवर त्याचा भार वाढल्याने चालक यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना याचा फटका बसत आहे. लांजा आगाराचे यामुळे वेळापत्रक कोलमडले आहे. (प्रतिनिधी)