शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास २० वर्षे सक्तमजुरी
By संदीप बांद्रे | Published: February 15, 2024 04:03 PM2024-02-15T16:03:15+5:302024-02-15T16:03:34+5:30
गावात गोंधळाच्या कार्यक्रम दाखविण्याचा बहाणा करत नेले अन् बळजबरीने अत्याचार केला
चिपळूण : मुंबईहून गावी पाहुणे आलेल्या १५ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ६ मे २०१८ मध्ये घडली होती. या प्रकरणी गुहागर तालुक्यातील उमराठ गोरिवलेवाडी येथील अजित देवजी गोरिवले (४०) यास २० वर्षे सक्त मजुरी व ५० हजार रूपये दंडाची शिक्षा येथील विशेष न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी गुरूवारी सुनावली.
मुंबईवरून गावी पाहुणी म्हणून आलेल्या व स्वतःच्या मुलीप्रमाणे असलेल्या १५ वर्षांच्या शाळकरी मुलीला आरोपी अजित देवजी गोरीवले याने गावात गोंधळाच्या कार्यक्रम दाखविण्याचा बहाणा करत नेले. त्यानंतर तिला मोटारसायकल वरून मौजे उमराठ येथील नवलाई मंदीराच्या पाठीमागील बाजूस नेवून बळजबरीने बलात्कार केला. तसेच तिला जिवे मारण्याची धमकी देत तिचे लैंगिक शोषण केले. बलात्काराच्या घटनेने घाबरलेल्या मुलीने शेवटी घडेलला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानुसार पिडीत मुलीच्या आईने गुहागर पोलीस स्थानकात अजित गोरिवले याच्या विरूध्द रितसर तक्रार दिली होती.
या प्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक समीर शेंडे यांनी सखोल चौकशी करीत अजित गोरिवले याच्या विरूद्ध भा. द. वि. कलम ३७६, ३२३, ५०६ अन्वये, तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमाचे कलम ४, ६, ८, १० अन्वये, गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर याबाबत चिपळूण येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांचेपुढे पुर्ण झाली. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अनुपमा ठाकूर यांनी ९ साक्षीदार तपासले. आरोपीने बचावासाठी १ साक्षीदार तपासला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी १५ रोजी या खटल्याचा निकाल जाहीर केला.
आरोपी अजित देवजी गोरिवले यास भारतीय दंड सहिंता कलम ३७६ (३), ३२३, ५०६ अन्वये तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम ६ अन्वये दोषी ठरवून भा. द. वि कलम ३७६ (३) व पोक्सो ४ व ६ प्रमाणे आरोपीस २० वर्षे सक्तमजूरी व ५० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास पुन्हा १ वर्षे सक्तमजूरीची शिक्षा देण्यात येईल, असा आदेश दिला आहे. तसेच नुकसान भरपाईची रक्कम पिडीतेला देण्याचा आदेशही न्यायालयाने केला आहे.
याबाबत आरोपीला दिलेल्या शिक्षेमुळे महिला व शाळकरी मुलींवर वाढलेल्या लैंगिक अत्याचार सारख्या घटनांना आळा बसेल, तसेच या शिक्षेमुळे पिडीतेला व तिच्या कुटूंबियांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील अनुपमा ठाकूर यांनी दिली. या खटल्यामध्ये ठाकूर यांना कोर्ट पैरवी प्रदीप भंडारी यांनी सहकार्य केले.