रत्नागिरीला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी २०० कोटी मंजूर, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 01:25 PM2024-08-03T13:25:50+5:302024-08-03T13:27:16+5:30
आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले
रत्नागिरी : स्टरलाइट कंपनीसाठीची जागा एमआयडीसीला परत मिळाल्यामुळे रत्नागिरी मोठी औद्योगिक वसाहत झाली आहे. त्यामुळे रत्नागिरीला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी २०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
ज्या ठिकाणी मोठ्या क्षेत्रात औद्योगिक वसाहत असेल ते शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्याची एमआयडीसीची योजना आहे. जशी पुण्यातील तळोजा ही स्मार्ट सिटी बनवण्यात आली आहे, त्याचपद्धतीने रत्नागिरीलाही स्मार्ट सिटी बनवले जाईल, असे मंत्री सामंत म्हणाले. स्टरलाइट कंपनीची साडेसातशे हेक्टर जागा एमआयडीसीकडे परत आली आहे. त्यामुळे आता रत्नागिरीची एमआयडीसी कोकणातील सर्वांत मोठी एमआयडीसी झाली आहे. त्यामुळेच येथे स्मार्ट सिटी योजना राबवण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. यासाठी एमआयडीसीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आपण २०० कोटी रुपये मंजूर केले असल्याचेही ते म्हणाले.
रत्नागिरीतील शासकीय रुग्णालय, नगर परिषद, १०० काेटींचे जिल्हा प्रशासनाचे कार्यालय, जिल्हा परिषद, एस. टी.चे विभागीय कार्यालय, एमआयडीसीतील विश्रामगृह या आधुनिक इमारती हा स्मार्ट सिटीचा पहिला टप्पा आहे. ही कामे शासकीय निधीतून झाली आहेत. आता पुढच्या टप्प्यात या २०० कोटी रुपयांमधून कोणती कामे करता येतील, याचा आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे. पर्यटन विकासाची कामे, शहरातील छोटे रस्ते, गटारे यासारखी कामे यातून करता येऊ शकतील. त्यासाठीच आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.