रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी दिला बारावीचा पहिला पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:46 PM2018-02-23T12:46:38+5:302018-02-23T12:52:50+5:30
बारावीची परीक्षा बुधवारपासून राज्यात सर्वत्र सुरू झाली. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी बारावीचा पहिला पेपर दिला.
रत्नागिरी : बारावीची परीक्षा बुधवारपासून राज्यात सर्वत्र सुरू झाली. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी बारावीचा पहिला पेपर दिला.
कोकण परीक्षा मंडळाने परीक्षेसाठी जिल्ह्यात ३७ परीक्षा केंद्र व १२ परिरक्षक कार्यालये नियुक्त केली आहेत. परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्थेचे नियोजन केले असून, बैठक क्रमांक पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळीच गर्दी केली होती. पालक व विद्यार्थी सकाळी ९.३० वाजल्यापासून परीक्षा केंद्रांवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना पेन, पॅड, हॉलतिकीट, पट्टी इतक्याच शैक्षणिक साहित्यासह प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोबत आणलेली सॅक बॅग परीक्षा केंद्रापासून दूरवर ठेवण्यात आल्याने ढिगारा जमला होता.
बारावी परीक्षेसाठी विज्ञान शाखेतून ३ हजार १३४ मुलगे, तर २ हजार ५२८ मुली, वाणिज्य शाखेतून ४ हजार ५०१ मुलगे, तर ४ हजार ७१५ मुली, कला शाखेतून ३ हजार ४५२ मुलगे, तर २ हजार ९३१ मुली, एमसीव्हीसी शाखेतून ३८० मुलगे, तर २४० मुली परीक्षेला बसली आहेत.
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात अर्धा तास आधी उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आल्यामुळे विद्यार्थीवर्ग वेळेवर उपस्थित होता. यावर्षीपासून केंद्र संचालकांनी पर्यवेक्षकांकडे सीलबंद पेपरची पाकिटे परीक्षेपूर्वी दिली. प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट दोन परीक्षार्थींच्या हस्ते फोडण्यात आले.
पेपर फुटी व कॉपीसारख्या गैरमार्गाना आळा घालण्यासाठी बोर्डाने यावर्षीपासून या नवीन पध्दतीचा आवलंब केला आहे. कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी बोर्डातर्फे १२ भरारी पथके तयार केली आहेत. मोबाईलसाठी सक्त मनाई करण्यात आली आहे. दुपारी २ वाजता पेपर सुटल्यानंतर पालकवर्ग पाल्यांना घेण्यासाठी हजर होता. केंद्र असणाऱ्या शाळा, महाविद्यालयांच्या वेळापत्रकामध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे.